विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्याअंतर्गत परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रातील भद्रकाली आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १० सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. यामध्ये गंजमाळ परिसरातील नऊ जणांच्या टोळीचा समावेश आहे.

परिमंडळ एकच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत १६१ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून ६२ गुन्हेगारांविरुद्ध तडीपार प्रकरणांची चौकशी सुरू आहे. सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १० सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचे निर्देश पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये गंजमाळच्या भीमवाडी परिसरातील नितीन हिवाळे, विश्वास ऊर्फ सोनू कांबळे, सौरभ पाथरे, भीमा पाथरे, योगेश हिवाळे, अमोल कोळे, शाम चव्हाण, सूरज लहाडे आणि शाम ऊर्फ शाहीर जावळे या टोळीवर कारवाई करण्यात आली.

टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे संबंधितांवर दाखल आहेत. या नऊ जणांना वर्षभराच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले. अन्य प्रकरणात महाराष्ट्र पोलीस कायदा ५६ (एक) अन्वये कालिकानगर येथील गणेश दातार या गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

दातारविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या तडीपार प्रकरणाची चौकशी होऊन त्याला नाशिक शहर, जिल्ह्य़ातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शहर पोलीस दोन किंवा त्याहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या, टोळी तयार करून दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत आहेत.