सार्वजनिक गणेशोत्सवाचे सहा दिवस झाल्यानंतर मंडप तपासणीसाठी समिती

नागरिकांना आता प्रतिक्षा नवरात्रोत्सवातील मंडपांची

नाशिक- गणेशोत्सवाचे सहा दिवस संपल्यानंतर नाशिक जिल्हा अंतर्गत महानगरपालिका हद्दीमधील सार्वजनिक सण, उत्सव आणि समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीकरीता समिती स्थापन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. मंडपांसंदर्भात कोणाला काही आक्षेप असल्यास ते या समितीकडे तक्रार करु शकतात.

नाशिकचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षां मीना यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हा दंडाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. नागरिकांना सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ प्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात कायमच तक्रारी असतात. रस्त्यावर असे मंडप उभारणाऱ्यांकडून परिसरातील नागरिकांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांना यासंदर्भात कुठे तक्रार करावयाची असल्यास त्याची कोणतीही माहिती नसते. हे लक्षात घेऊन नागरिकांना तक्रार करावयाची असल्यास त्यांनी सदर समितीतील नेमणूक करण्यात आलेल्या पथकातील सदस्यांशी संपर्क साधवा, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी डोईफोडे यांनी केले आहे. परंतु, हे आवाहन करण्याआधीच गणेशोत्सवाचे सहा दिवस संपले आहेत. आता अवघे चार दिवस बाकी असल्याने समितीला नागरिकांचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी साशंकताच आहे. कारण गणेशोत्सवात रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांविषयीच नागरिकांची प्रामुख्याने नाराजी असते. या मंडपांमुळे परिसरातील दुकानेही उघडता येत नसल्याची काही ठिकाणी स्थिती असते. परंतु, त्याविषयी व्यापाऱ्यांना गप्पच राहावे लागते,  नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी संनियंत्रण समितीच्या मंडप समिती पथकातील सदस्यांचे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी क्रमांक नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले आहेत.

तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक

नाशिक उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथाउपविभागीय अधिकारी वर्षां मीना – दूरध्वनी क्रमांक ०२५३- २५७८४००, ७८९५६६१०९५, ७०५७७४७५२३,

सहायक आयुक्त विभागीय अधिकारी स्वप्निल मुदलवाडकर- ०२५३-२५९७९८२, ९६०७५०३३४४,

मदन हरिश्चंद्र- ०२५३-२५८२३४८, ९४२३१७९१२३,

एम.डी. पगारे- ०२५३-२५१२३५३, ९४२३१७९१६९

मयुर पाटील- ०२५३-२३९०७३८, ८०८७६२७१४१

नितीन नेर- ०२५३-२३५०३६७, ९४२३१३१३२१

संजय गोसावी- ०२५३- २४६०२३४, ९८२२५४५५९५

नाशिक शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक  पोलीस आयुक्त सिताराम गायकवाड- ०२५३-२३०५२२८,  ९१४६९३३५६३