23 November 2017

News Flash

रेल्वे मार्ग दुहेरीकरणामुळे मनमाड-पुणे अंतर तीन तासांनी कमी होणार

वाहतुकीला अधिक चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

अनिकेत साठे, नाशिक | Updated: September 14, 2017 7:00 AM

मनमाड-दौंड दुहेरी रेल्वे मार्ग मनमाड रेल्वे स्थानकाहून सुरू होणार आहे.

तीन तासांनी कमी

मनमाड-पुणे हे अंतर कापण्यासाठी मनमाड-दौंड एकेरी मार्गामुळे रेल्वे गाडय़ांना सध्या जो साडेसहा ते सात तासांचा अवधी लागतो, तो दुहेरीकरणामुळे तीन तासांनी कमी होणार आहे. त्याचा लाभ नाशिक, पुणे व नगरसह मराठवाडा व दक्षिण भारतातून ये-जा करणाऱ्या ५० हून अधिक रेल्वे गाडय़ांतील प्रवाशांना होणार आहे. तसेच माल वाहतुकीला अधिक चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी दोन हजार ३३० कोटी रुपये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. केंद्राच्या निर्णयामुळे  मागील दीड दशकापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागल्याची भावना व्यक्त होत आहे. दक्षिण भारत, मराठवाडा या भागातून पुण्याकडे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाडय़ांसाठी दौंड-मनमाड टप्पा पार करणे जिकिरीचे ठरते. एकेरी मार्गामुळे ये-जा करणाऱ्या प्रत्येक गाडीला कोणत्या ना कोणत्या थांब्यावर तिष्ठत राहावे लागते. मनमाड-दौंड हा अतिशय गर्दीचा मार्ग आहे. तो एकेरी असल्याने वाहतुकीचा दररोज मोठा खोळंबा होतो. दुहेरीकरणामुळे मुख्यत्वे वेळेची बचत होईल. हे काम पूर्णत्वास गेल्यावर मनमाड-पुणे रेल्वे प्रवास साडेचार तासांवर येणार असल्याचा अंदाज सामाजिक कार्यकर्ते सतीश शेकदार यांनी व्यक्त केला. दुहेरीकरणामुळे कमी वेळेत जलद प्रवास, पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थाटन, शेतमाल व औद्योगिक मालाची वाहतूकही सुलभ होईल. या रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. जलद रेल्वे वाहतुकीमुळे उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, याकडे लक्ष वेधले जात आहे.

मागील पाच वर्षांपासून मनमाड-दौंड एकेरी मार्गावर सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गत वर्षी त्याअंतर्गत मनमाड ते सारोला खंड या पहिल्या टप्प्याच्या विद्युत मार्गाचे उद्घाटन होऊन इलेक्ट्रिक इंजिनद्वारे मार्गाची चाचणीही झाली होती. आता दुहेरीकरण पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच महत्त्वाकांक्षी मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे काम प्रस्तावित असल्याने उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे.

रेल्वे मार्गाचा इतिहास

मनमाड-दौंड हा ब्रिटिशकालीन लोहमार्ग अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. पूर्वीच्या काळात सोयी-सुविधा नसल्याने मनमाड-दौंड एकेरी मार्गावर मनमाड- दौंड- पुणे यासह दोन ते तीन प्रवासी गाडय़ा कोळशाच्या इंजिनवर धावत होत्या. नंतर नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस ही एकमेव जलद प्रवासी गाडी सुरू झाली. पूर्वी मनमाड-औरंगाबाद मीटरगेज लोहमार्ग होता. त्याचे ब्रॉडगेजमधे रूपांतर झाल्यावर मराठवाडय़ातून थेट दौंड-पुण्यापर्यंत रेल्वे धावू लागल्या. कोळशाचे इंजिन हद्दपार होऊन डिझेल इंजिन आले आणि या मार्गावरील प्रवास गतिमान झाला. गाडय़ांची संख्या वाढली. पूर्णा, नांदेड, औरंगाबाद येथून मनमाडमार्गे थेट दौंड-पुण्यापर्यंत पॅसेंजर व एक्स्प्रेस गाडी सुरू झाली. सद्य:स्थितीत उपरोक्त भागासह उत्तर भारतातून गोरखपूर-पुणे, हावडा-पुणे, नागपूर-पुणे, म्हैसूर-दिल्ली सुवर्णजयंती एक्स्प्रेस, पुणे-लखनौ आदी ५२ गाडय़ा मनमाड-दौंड या एकेरी मार्गावरून धावतात.

First Published on September 14, 2017 1:52 am

Web Title: the big advantage from railway projects to maharashtra part 2