18 February 2020

News Flash

 ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमामुळे जन्मदराचा टक्का वाढला

जन्मदर वाढावा यासाठी ग्रामपंचायतमध्ये ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला.

नाशिक जिल्हा तिसऱ्या स्थानावर, २१ सोनोग्राफी केंद्रे बंद

नाशिक : बीड येथील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. मुलींचा जन्मदर, स्त्रीभ्रूण हत्या विषयांवर आवाज उठविला गेला. त्यानंतर हा विषय लोकांच्या विस्मृतीत जात असताना आरोग्य विभाग मात्र मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिला. ‘करू या मुलीच्या जन्माचे स्वागत’सह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून प्रसूतीपूर्व काळात गर्भातील जीवाशी होणारा खेळ थांबल्याने मुलींचा टक्का जिल्ह्य़ात वाढला आहे. राज्यात नाशिक जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पाच वर्षांत सात डॉक्टरांची पदवी रद्द करून २१ सोनोग्राफी केंद्रे जिल्ह्य़ात बंद करण्यात आली.

‘वंशाला दिवा’, ‘कुलदीपक’ अशा वेगवेगळ्या भ्रामक संकल्पनांमध्ये गुरफटलेला समाज आजही मुलाच्या जन्मासाठी आग्रही आहे. लोकांच्या याच मानसिकतेचा फायदा वैद्यकीय वर्तुळातील काही मंडळी घेत असल्याने मुलीच्या जन्माचा दर काही वर्षांपूर्वी कमालीचा घसरला. बीड येथील स्त्रीभ्रूण हत्याकांडाने वैद्यकीय क्षेत्राचा काळा चेहरा समोर आल्यानंतर सारेच हादरले. या पाश्र्वभूमीवर राज्यातील स्त्री-पुरुष लिंगोत्तर प्रमाणात विचार करता राज्यातील संवेदनशील जिल्हे शोधून त्या ठिकाणी मुलीचा जन्मदर कसा वाढेल, यासाठी प्रयत्न झाले. नाशिक जिल्हा परिसरात हे चित्र आशादायी असले तरी मुलींच्या जन्माचा टक्का घसरलेला होता. आरोग्य विभाग, सामाजिक संस्थाच्या वतीने यासाठी पुढाकार घेण्यात आला.

जन्मदर वाढावा यासाठी ग्रामपंचायतमध्ये ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल, यासाठी प्रयत्न झाले. दुसरीकडे, जिल्हा परिसरातील सोनोग्राफी केंद्र, ज्यांना दोन मुली आहेत अशा कुटुंबीयांची यादी मिळवण्यात आली. सोनोग्राफी केंद्रावर भरारी पथकांकडून वेळोवेळी छापे टाकण्यात आले. तांत्रिक त्रुटीसाठी कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या, तर ज्या ठिकाणी काही आक्षेपार्ह आढळले, ती केंद्रे थेट गोठविण्यात आली.

जिल्ह्य़ात या कारवाईअंतर्गत सात डॉक्टरांची नोंदणी रद्द झाली, तर १२ जणांवर गुन्हे दाखल झाले. तसेच २१ केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली. जिल्हा प्रशासनही वेगवेगळ्या माध्यमांतून यावर लक्ष ठेवून असल्याने पाच वर्षांत मुलींचा जन्मदर वाढला आहे. २०१५-२०१६ मध्ये लिंगोत्तर असणारे ९३५ हे प्रमाण २०१८-२०१९ मध्ये ९६९ इतके झाले आहे.

जिल्ह्य़ात प्रमाण थांबले, पण परराज्यात तपासणी

जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुलींच्या जन्माचा दर वाढावा यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न झाले. यासाठी भरारी पथके नेमण्यात आली असून महिनाभरात जिल्ह्य़ात कोठेही अचानक छापा टाकला जातो. नोंदणी रद्दमुळे वैद्यकीय वर्तुळात भीती पसरली आहे. दुसरीकडे, संशयितांची गोपनीयरीत्या माहिती मिळवत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. जिल्हा परिसरात या कारवाईचा धसका घेण्यात आला असला तरी यातून पळवाट म्हणून काही जण परराज्यात जाऊन गर्भलिंग तपासणी करतात. दोन मुलींनंतर गर्भपात करणाऱ्या पालकांची माहिती घेत त्यातील कारणे शोधली जात आहेत.

– डॉ. सुरेश जगदाळे  (जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक)

२०१४-२०१५       ९१६

२०१५-२०१६       ९३५

२०१६-२०१७       ९४०

२०१७-२०१८       ९७०

२०१८-२०१९       ९६९

First Published on January 21, 2020 3:49 am

Web Title: the birth rate of the girls grown in nashik zws 70
Next Stories
1 शहरातून अनेक पक्ष्यांचे स्थलांतर, कबुतरांच्या संख्येत वाढ
2 नादुरुस्त वीज रोहित्रांची ग्रामीण आमदारांना डोकेदुखी
3 पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात – रावसाहेब दानवे
Just Now!
X