रुग्णालयांमध्ये छोटय़ा मुलीची प्रतिकृती बसवून दृक्श्राव्य माध्यमातून प्रबोधन

स्त्रीभ्रूण हत्येला पायबंद बसावा यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न सुरू असले तरी ‘मुलगाच हवा’ ही लोकांची मानसिकता या प्रयत्नांना मारक ठरत आहे.  याविषयी प्रबोधन करण्यासाठी आरोग्य विभाग आणि प्रशासन ‘लेक वाचवा’ चा जागर करण्यासाठी विविध उपक्रम रुग्णालय परिसरात राबवत आहे. प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्य़ातील २८ रुग्णालयांमध्ये छोटय़ा मुलीची प्रतिकृती बसवत दृक्श्राव्य माध्यमातून याविषयी माहिती दिली जात आहे.

देशभरात स्त्रीभ्रूण हत्येची विविध प्रकरणे उघड होत असताना केंद्रस्तरावर ज्या जिल्ह्य़ांचा स्त्री जन्मदर कमी आहे, अशा १०० जिल्ह्य़ातील प्रशासनाधिकारी, आरोग्य अधिकारी यांना दिल्लीत बोलविण्यात आले. यामध्ये नाशिकचाही समावेश होता. मुलगी वाचवा संदर्भात कार्यशाळा घेत त्यासाठी कोणते उपक्रम राबविता येतील, याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. राज्यात स्त्री जन्मदराबाबत मागे असलेला नाशिक जिल्हा अग्रस्थानावर यावा यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम हाती घेतले.

गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायत पातळीवर मुलीच्या जन्माचे स्वागत, वेगवेगळ्या पथनाटय़ांतून याविषयी प्रबोधन तसेच फलक आणि जाहिरातीचा आधार घेण्यात आला. या अंतर्गत नुकतेच आरोग्य विभागाने जिल्हा विकास नियोजन समितीच्या माध्यमातून ‘बेबी डॉल’ अर्थात लहान मुलींच्या प्रतिकृती खरेदी केल्या आहेत. नुकत्याच या प्रतिकृती जिल्हा शासकीय रुग्णालय, पाच उपजिल्हा रुग्णालय, २२ ग्रामीण रुग्णालय आणि एक सामान्य रुग्णालय अशा २८ रुग्णांलयामध्ये बसविण्यात आल्या. रुग्ण, नातेवाईक, गरोदर माता यांचे प्रबोधन व्हावे, मुलींचे समाजातील महत्त्व त्यांना समजावे यासाठी ही बाहुली उपयोगी ठरत असल्याचा दावा  विभाग करत आहे. बाहुलीच्या देखभालीचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे. बहुतांश ठिकाणी  बाहुल्या कार्यान्वित झालेल्या नाहीत.

मुलींच्या जन्मदरात वाढ

तीन वर्षांपूर्वी हजार मुलांमागे असलेला ९१३ हा मुलींच्या जन्माचा आकडा आता ९८१ पर्यंत पोहचला आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासन तसेच आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. या अंतर्गतच बोलणारी बाहुली रुग्णालयाच्या आवारात बसविल्या आहेत. जेणे करून पालकांचे प्रबोधन होईल. पुढील टप्प्यात ग्रामीण भागात या उपक्रमाची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याकडे कल राहील.

-डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सकतथा नाशिक विभाग आरोग्य संचालक

हसरी बाहुली काय सांगते..

हसऱ्या चेहऱ्याची ही बाहुली हातात पाटी घेत मुलगी वाचवा हा संदेश देत आहे. दृक-श्राव्य माध्यमाद्वारे मुलींसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना, त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, महिलांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, त्यांचा संघर्ष, मुलगी म्हणून होणारी हेटाळणी आणि त्यावर मात करत त्यांनी मिळविलेले यश, अशा वेगळ्या यशोगाथाही बाहुली सांगते.