आनंदोत्सवातही राजकारण

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी भुजबळ फार्म परिसरात समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, मिठाई भरवत जल्लोष साजरा केला. राज्यात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शिवसेनेने एकत्रित स्वरूपात आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे फारसे पदाधिकारी नव्हते. भुजबळ समर्थकांच्या जल्लोषात इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अंतर राखले.

या वेळी समता परिषदेचे दिलीप खैरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना महाले, कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे आदी उपस्थित होते. भुजबळ यांनी गुरुवारी शिवतीर्थावर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते या सोहळ्यास उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी समता परिषदेचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांच्यासह शेकडो समर्थकांनी एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी केली. एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष केला. या वेळी राजेंद्र भगत, अनिल परदेशी, चिन्मय गाडे, अजय पाटील, कैलास झगडे, पप्पू शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सत्तेत तीन पक्ष असल्याने प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्रपणे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. सेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला निमंत्रित केले होते. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि मुख्यत्वे समता परिषदेने धूमधडाक्यात आनंदोत्सव साजरा केला. या वेळी सेना, काँग्रेसचे कोणी नव्हते. राष्ट्रवादीचे काही निवडक पदाधिकारी वगळता समता परिषद आणि भुजबळ समर्थकांची अधिक गर्दी होती. आनंदोत्सव साजरा करताना तिन्ही पक्षांनी राजकारण करण्याची संधी साधल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.