शिक्षक भरतीतील भ्रष्टाचारावर नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्य़ात २०१२ पासून शिक्षक भरती बंद असल्याने इच्छुकांना या भरतीमुळे संधी प्राप्त होणार आहे. पवित्रच्या माध्यमातून सरकार शिक्षक भरतीवर नियंत्रण ठेवणार आहे.

शासन सहाय्य मिळणाऱ्या सर्व शाळांमधील त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी, अनुदानित, अशंत: अनुदानित आणि अनुदानास पात्र शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

यासाठी सीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांची उपलब्धता, त्यांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेद्वारे तपासली जाणार आहे. यासाठी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदांची जाहिरात ही शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. यानुसार पात्र शिक्षकांनी ऑनलाइन अर्ज करणे अपेक्षित आहे. संबंधित संस्थेस प्राप्त होणाऱ्या अर्जामधून विषयनिहाय आरक्षणानुसार गुणवत्ता यादी संस्थेस उपलब्ध होईल. यादीतील उच्चतम गुणवत्ताधारकास संबंधित संस्था नियुक्त करेल. नाशिक जिल्ह्य़ात पाच वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नसल्याने पवित्रमुळे शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे. जिल्ह्य़ात साधारणत: शंभरपेक्षा अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. संबंधित शिक्षकांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.