|| चारूशीला कुलकर्णी

सुविधेअभावी नोकरदार मातांसह बाळांचे हाल

नवजात शिशुसाठी आईचे दूध हे जीवामृत असते. बदलत्या काळात तारेवरची कसरत करणाऱ्या नोकरदार आईला स्तनपान जमतेच असे नाही. नैसर्गिक दुधाला पर्याय म्हणून बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या दुधाची भुकटी विक्रीस आहे. हे कृत्रिम दूध बाळासाठी लाभदायक नसून भविष्यात बाळास स्थूलता, मेंदूची अपुरी वाढ यासह अन्य आजार उद्भवू शकतात. मातेलाही अन्य काही आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होऊ शकतात. हा धोका टाळण्यासाठी ‘मिल्क बँक’ची आवश्यकता असली तरी नाशिक या संकल्पनेपासून दूर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

डॉ. अरमेंडा फर्नाडिस यांनी सायन हॉस्पिटल येथे पहिली ‘दूध बँक’ सुरू केली. ही संकल्पना नाशिक शहरात फारशी रुजलेली नाही. स्तनदा मातेचे दूध र्निजतूक केलेल्या वाटीत काढून चोवीस तास बाहेर ठेवले तरी त्यापासून बाळाला कुठलीही बाधा होत नाही. नोकरदार मातांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित कक्ष उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी माता बाळासाठी सुरक्षितरीत्या दूध काढून ठेवू शकते. ही जागा ‘दूधबँक’ म्हणून ओळखली जाते. यामुळे बाळाला मातेचे दूध मिळू शकेल. मात्र ही व्यवस्था बोटावर मोजता येईल, इतक्याच ठिकाणी उपलब्ध आहे. नोकरदार मातांचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. कामाच्या ठिकाणी दूध काढण्याची व्यवस्था नाही. पाळणाघर कामाच्या ठिकाणापासून दूर असल्याने बाळाला वेळेत दूध मिळत नाही. त्याला वरच्या दुधावर अवलंबून राहावे लागते. यासाठी कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू होणे गरजेचे आहे. बाळाला आईचे दूध न मिळाल्याने त्याला जंतुसंसर्ग होतो.

मेंदूची वाढ होत नाही. शिवाय त्याला पुढील काळात अस्थमा, स्थूलता, हृदयरोग यांचा धोका असतो, असे ‘मॉ’ अभियानचे समन्वयक डॉ. प्रशांत गांगल यांनी सांगितले.  अलीकडेच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात शासकीय परिपत्रक काढले असून त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘दूध बँक’ अनिवार्य करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह राज्यात २५ ठिकाणी ही बँक सुरू आहे.

मिल्क बँकेत स्तनदा मातांचे दूध साठवले जाते. स्तनदा मातांना आपले दूध दुसऱ्या कोणाला दिल्यास आपल्या बाळासाठी दूध राहणार नाही किंवा दूध आटेल, अशी भीती असते. परंतु निसर्गत: आईची दूध देण्याची क्षमता ही बाळाच्या भुकेपेक्षा जास्त असते. तसेच मिल्क बँकेत दूध सुरक्षितरीत्या साठविल्याने बाळाला ते उपयुक्त असते. असे दूध अतिदक्षता कक्षातील बालक, पाळणाघरातील बालकांसाठी उपयुक्त ठरते.       डॉ. सतीश तिवारी (समन्वयक, मिल्क बँक)