महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा वाढविणे आणि राज्यसेवा २०१६ची पदसंख्या वाढविणे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी शिवसंग्रामच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून या संघटनेने आंदोलन केले होते. तेव्हा राष्ट्रवादीशी या संघटनेशी मित्रत्वाचे संबंध होते. पुढील काळात या संघटनेचे नेते भाजपच्या जवळ गेले. आता भाजप-सेना युतीच्या काळात पुन्हा आंदोलन छेडत आपले अस्तित्व दाखविण्याची धडपड या माध्यमातून केली जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. त्यात प्रामुख्याने पोलीस उपनिरीक्षकाची वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३३ वर्षे करावी, महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेची वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ४० वर्षे करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सी-सॅट प्रश्नपत्रिका काठिण्य पातळीवर लोकसेवा आयोगाला समांतर करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे शुल्क कमी करावे आणि मुलींचे शुल्क लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर माफ करावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे वसतिगृह व ग्रंथालय उभारण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

सर्व परीक्षांसाठी शासनाने ई-पोर्टल सुरू करणे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलाखतीत यशस्वी न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील एक वर्षांसाठी मासिक पाच हजार विद्यावेतन देणे, राज्य शासनामध्ये रिक्त असलेल्या पदांची त्वरित भरती करणे आवश्यक असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.

याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या मागण्या मान्य न झाल्यास राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित जाधव, प्रवीण दातीर, सुनील बोराडे, अभिजीत तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.