जागतिक वारसा सप्ताहात विविध कार्यक्रम

शिवकालीन शस्त्रास्त्रांचे विविध प्रकार.. इतिहासकालीन नाणी.. जुन्या हस्तलिखितांचे प्रदर्शन असा अमूल्य खजिना नाशिककरांसाठी जागतिक वारसा सप्ताहामुळे सोमवारपासून खुला झाला आहे. सरकारवाडय़ात सुरू झालेले प्रदर्शन २५ नोव्हेंबपर्यंत नाशिककरांसाठी खुले राहणार असून अधिकाधिक नाशिककरांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक वस्तुसंग्रहालयाच्या अभिरक्षक शीला वाहणे यांनी केले आहे

येथील पुरातत्त्व विभाग, प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आणि दि सराफ असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित जागतिक वारसा सप्ताहला  सोमवारी सुरुवात झाली. सप्ताहाचे उद्घाटन दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर त्यांनी नाणे प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली.

यंदा ‘हेरिटेज ऑफ जनरेशन’ संकल्पनेवर विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून श्रीराम शिवकालीन मर्दानी आखाडाच्या वतीने बाल खेळाडूंनी मर्दानी खेळ सादर केले. तसेच शिवकालीन शस्त्रसंग्रहालयाच्या वतीने शिवकालीन शस्त्रसंग्रह, नाशिक क्वाइन कलेक्टर सोसायटी यांच्याकडून तसेच चेतन राजापूरकर यांचे नाणी प्रदर्शन, डॉ. अनिता जोशी यांचे जुने हस्तलिखित प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले आहे.

सप्ताहात गुरुवारी सरकारवाडा ते सुंदर नारायण मंदिर परिसरात इतिहास जाणून घेण्यासाठी पदभ्रमण होणार आहे. मोडी लिपीतज्ज्ञ प्रशांत पाटील यांची नि:शुल्क कार्यशाळाही होणार आहे. या कार्यशाळेत इस्पायर शाळेच्या १०१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेव्याचे जतन व्हावे यासाठी ठिकठिकाणी जनजागृतीविषयी पथनाटय़ होणार आहे. सप्ताहात ‘शोध नाशिक नगरीच्या अस्तित्वाचा’ यावर डॉ. जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. शनिवारी पेडगाव किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच रविवारी सप्ताहाचा समारोप गड स्वच्छता मोहिमेने होणार आहे. या वेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या मदतीने गाळणा किल्ला येथे गड स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. नाशिककरांनी विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.