15 December 2017

News Flash

अपर पोलीस अधीक्षकांच्या घरात सहा लाखांची चोरी

पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न

नाशिक | Updated: August 4, 2017 12:40 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षकपदी असलेले प्रशांत बच्छाव यांच्या येथून जवळच असलेल्या कौळाणे येथील घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे साडे सहा लाखाचा ऐवज लंपास केला. हा प्रकार गुरूवारी उघडकीस आला. काही दिवसात ग्रामीण भागात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असतांना आता चोरटय़ांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी डल्ला मारत पोलिसांना आव्हान दिले आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कौळाणे गावालगत असलेल्या शेतात बच्छाव यांचे आई-वडील वास्तव्यास आहेत. त्यांची आई बाहेरगावी गेली असतांना बुधवारी रात्री वडील जगन्नाथ बच्छाव हे बंगल्याला बाहेरून कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. पहाटे चारच्या सुमारास झोपेतून उठून खाली आल्यावर घराचे कुलूप तोडल्याचे व घरातील दागिने, रोख सहा हजार रूपये असा साडे सहा लाखाचा ऐवज गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर तालुका पोलीस त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. बच्छाव यांच्या घरापासून जवळच असलेल्या जैन मंदीराचेही कुलूप तोडल्याचे सकाळी दिसून आले. त्या ठिकाणाहून काहीही चोरीस गेले नाही. शेजारच्या मुंगसे गावातील एका डॉक्टरच्या घरीदेखील चोरीचा प्रयत्न झाला. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसात निमगाव, येसगाव या गावांमध्ये किमान पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

First Published on August 3, 2017 9:22 pm

Web Title: theft in house of upper police superintendent in malegaon