शहरातील विविध भागांत घडलेल्या चोरीच्या घटनांच्या तपासात संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेले मौल्यवान दागिने, वाहने व तत्सम वस्तू गुरुवारी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना वितरित करण्यात आले.

आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. पोलीस यंत्रणेविषयी कृतज्ञता व्यक्त करत अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

शहरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणत असताना संशयितांकडून चोरलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या सर्व वस्तू तक्रारदारांना सन्मानपूर्वक वितरित करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली होती.

त्यानुसार गुरुवारी परिमंडल एकमधील सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी, आडगांव नाका आदी पोलीस ठाण्यांत सोनसाखळी, मौल्यवान दागिने आणि वाहन चोरीच्या तक्रारदारांना त्यांचा मौल्यवान ऐवज परत करण्यात आला. पोलीस आयुक्त जगन्नाथन यांच्या हस्ते तर पोलीस उपायुक्त विजय पाटील, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकांत धिवरे, साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे आदींच्या उपस्थितीत पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यात सोन्याच्या ८ लगड १०० ग्रॅम वजनाच्या, ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, रोख १,७५,००० रुपये, १३ वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुचाकी, प्रत्येकी एक रिक्षा, सायकल, भ्रमणध्वनी, अ‍ॅम्प्लिफायर व लॅपटॉप अशा सुमारे ११ लाख रुपयांच्या मालाचा त्यात समावेश आहे.

या वेळी सुहास मिसर, रमेश शिरपाळे, मंगेश जाधव, वासुदेव लोणारे, अशोक बेलेकर, चंद्रमणी भैयसारे, नारायण जाधव, सतीश गांगुर्डे, शांताराम तांबे, वर्षां मोटकरी, रमेश परदेशी, संपत मेदणे, विजय यशोद, संगीता कनसे, वैशाली आसोले, लता उदावंत, मंजीत सिंग, राहुल भालेराव, प्रमोद हेंदवे, शिवराम सुजगुरे, लता चाफेकर, सुयोग भुसे, लक्ष्मण कनडकर, मनोज जगदाळे, योगेश खैरनार, छाया चौधरी, साधना व्यवहारे यांना त्यांचे साहित्य देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांनी आपल्या सभोवताली घडणाऱ्या समाजविघातक कृत्यांबाबत सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे

सांगितले. पोलिसांनी सुरू केलेल्या विविध अ‍ॅपची माहिती देण्यात आली. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.