तीनशेहून अधिक आदिवासी वेगवेगळ्या योजनांपासून वंचित

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

अमृत आहार.. जननी शिशू सुरक्षा.. जननी सुरक्षा.. मानव विकास, अशा कोणत्याच योजना माहीत नाहीत. बाळंतपणासाठी तालुक्याला कोण जाणार, म्हणून घरीच बाळंत होणाऱ्या महिलांची संख्या अधिक. हे चित्र गडचिरोली किंवा मेळघाटमधील नाही. शासकीय योजनेपासून कोसो दूर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावाची ही शोकांतिका. शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर पायपीट करा आणि लाभार्थी व्हा. थेट मदत तुमच्यापर्यंत येणार नाही. गावापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नसल्याने प्रशासनाचा हा बाणा आजही कायम असल्याने आजही येथील ३०० पेक्षा अधिक आदिवासी वेगवेगळ्या योजनांपासून वंचित आहेत.

मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या अलीकडे असलेल्या इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर चिंचोळे गाव. या गावापर्यंत जाण्यासाठी ग्रामसडक योजनेतून रस्ता पोहचला. पण तेथून पाच किलोमीटर अंतरावर असलेले खैरेवाडी, वैतागवाडी, उघडेवाडी अशा वाडय़ांपर्यंत आजही रस्ता झालेला नाही. गावात वीज, पाणी, रस्ता अशा मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. ग्रामस्थांचा लढा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू असताना याचा सर्वाधिक फटका महिला आणि बालकांना बसत आहे. विशेषत: गरोदर माता, नवजात शिशू, मुले यांना आरोग्य आणि शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

गावात पोहोचण्यासाठी रस्ता नाही, या एकमेव सबबीमुळे गावात आशा, अंगणवाडी सेविका दोन-तीन महिने फिरकत नाहीत. ज्या दिवशी गावात आशा-अंगणवाडी सेविका येतील, तेव्हाच बाळाचे वजन, कोणाचे लसीकरण, गरोदर मातांना काही औषधे दिली जातात. त्यांच्या काही नोंदी घेतल्या जातात. इतर वेळी गावातील मदतनीस छाया शिद हिच्यावर अंगणवाडीची भिस्त आहे. गावात सद्य:स्थितीत दोन बालके कुपोषित आहेत. त्यांना व्हीसीडीसीसाठी इगतपुरी रुग्णालय गाठावे लागते. बाळाला अंगा-खांद्यावर घेत कुटुंबातील सदस्यांना तीन डोंगर, नाले, जंगल पार करत चिंचोळे गाठावे लागते. त्या ठिकाणी वाहन व्यवस्था न झाल्यास पायपीट करत महामार्ग गाठावा लागतो. ही धावपळ कुटुंबीयांच्या जिवावर बेतणारी आहे. हीच अवस्था रुग्ण, गरोदर मातांसाठी आहे. ‘रस्ता नाही’ या एकमेव सबबीखाली सर्व यंत्रणा गावाच्या मुलभूत गरजांकडे सोयीस्कररीत्या पाठ फिरवत आहे.

अंगणवाडीत सध्या १५ बालके आहेत, तर टीएचआर १२ बालकांना दिला जात आहे. पण हा टीएचआर मिळवण्यासाठी मला पायपीट करत डोक्यावर भार उचलून चिंचोळे गाव गाठावे लागत असल्याचे शिद यांनी सांगितले. प्रमुख अंगणवाडी सेविका शहापूरला राहतात. त्यामुळे आठवडय़ातून एखादा दिवस येऊन त्या निघून जातात. त्यामुळे अंगणवाडीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. या बालकांना अंगणवाडीत दिला जाणारा आहार मीच शिजवते. ते अन्न-धान्य मिळवण्यासाठी पायपीट आता कामाचा भाग बनली असल्याची अगतिकता त्यांनी        व्यक्त केली. फुलाबाई बुरबुडे यांनी नवव्यांदा मी आई होणार असल्याचे सांगितले. चार मुलगे आणि चार मुली आहेत. माझे कुठलंही बाळंतपण शासकीय रुग्णालयात झालेले नाही. घरीच झाले. औषध, इंजेक्शन, गोळी असे काही नाही. पायपीट अशा अवस्थेत करणं जड जातं. उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी जंगल ओलांडावे लागते. नवरा सोबत येतो. तोही पाणी भरतो. पावसाळ्यात धो-धो पावसात घर पडतं की काय, अशी स्थिती राहते. पाणीप्रश्न पाचवीला पुजलेला असताना गावात कोणीही यायला तयार नाही, अशी खंत बुरबुडे यांनी व्यक्त केली.

सारा भार डोक्यावर

अंगणवाडीतील बालकांचा आहार शिजवण्याचे धान्य असो किंवा सहा महिन्यांपुढील बालकांसाठी असणारा टीएचआर. शासनाकडून कुठलीही मदत थेट गावात येतच नाही. चिंचोळे येथे जाऊन ते धान्य, टीएचआरची पाकिटे ताब्यात घ्यायची. दहा किलोमीटरची पायपीट डोंगर, दरीतून करायची. हा सर्व भार डोक्यावर, खांद्यावर घेऊन अंगणवाडी मदतनीस गावात येते. यासाठी मिळणारे मानधन तुटपुंजे असून तेही नियमित नाही.