News Flash

युरियाचा तुटवडा भासणार नाही

खरीप हंगामाच्या दृष्टीने राज्यात युरियाचा राखीव साठा करण्यात आला असून युरियाचा महाराष्ट्रात तुटवडा भासणार नाही

सिन्नर येथे कृषी संजीवनी मोहिमेप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे. समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

कृषिमंत्री दादा भुसे यांचा विश्वास, कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ

नाशिक : खरीप हंगामाच्या दृष्टीने राज्यात युरियाचा राखीव साठा करण्यात आला असून युरियाचा महाराष्ट्रात तुटवडा भासणार नाही, असा विश्वास कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे व्यक्त के ला. सिन्नर तालुक्यातील वडगांव येथे भागवत बलक यांच्या शेतात राज्यस्तरीय कृषी संजीवनी मोहिमेचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी भुसे बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बी.बी.एफ. पेरणी यंत्राच्या साहाय्याने पीक पेरणी केल्यास शेतकऱ्याला उत्पन्नवाढीसाठी निश्चितच लाभ होईल. संपूर्ण राज्यात २१ जून ते एक जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम राबविली जात आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, मका व हरभरा पिकांच्या पेरणीसाठी बी.बी.एफ. पेरणी यंत्र खूप उपयुक्त आहे. या यंत्राच्या साहाय्याने पेरणी केल्यास निविष्ठा खर्चात २० ते २५ टक्के बचत होऊन उत्पन्नात २५ ते ३० टक्के वाढ निश्चित मिळते. अवर्षणप्रवण क्षेत्रात याचा उपयोग होईल, असे भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत भुसे यांनी शेततळ्यांसाठी कुंपण, सोयाबीन लागवड, नावीण्यपूर्ण प्रयोग, आधुनिक वाण, बियाणाचा वापर, कृषी योजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पीक विमा व फळपीक विमा हा या वर्षांपासून ऐच्छिक केला असून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाकडे विमासंबंधी प्रारूप सादर केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

या वेळी शेतकरी बलक यांच्या शेतात बी.बी.एफ. पेरणी यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला ट्रॅक्टर, बियाणेवाटप करण्यात आले. भुसे यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त कारभारी सांगळे, भागवत बलक, रामहरी सुरसे, बाळासाहेब मराळे, महिला शेतकरी अलका बोडके यांचा सत्कार करण्यात आला आहे. या वेळी खरीप हंगामअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी आमदार राजाभाऊ  वाजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, कृषी साहाय्यक संचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:11 am

Web Title: there will be no shortage of urea ssh 93
Next Stories
1 खासगी शिकवणीवर्ग संचालकांचे आंदोलन
2 इयत्ता नववी ते दहावीचे वर्ग शाळेत सुरू करण्यास परवानगी द्या
3 हंगामपूर्व द्राक्ष उत्पादनाच्या जोखमीला विमा संरक्षण
Just Now!
X