News Flash

नाशिकच्या बोधलेनगर भागात चोरटय़ांचा धुमाकूळ

शहरातील बोधलेनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत चार घरे फोडून ८२ हजारांचा ऐवज लंपास केल्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील बोधलेनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घालत चार घरे फोडून ८२ हजारांचा ऐवज लंपास केल्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. इमारतीत चोर शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. चार चोरटे पसार झाले असले तरी सिखलकरी गँगच्या एकाला पकडण्यात यश मिळाले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून धडक मोहिमा राबविल्या जात असताना हा प्रकार घडला. बोधलेनगर भागातील विद्यांचल सोसायटी आणि भगवती दर्शन इमारतीतील बंद घरे चोरटय़ांनी लक्ष्य केली. चार सदनिकांचे टाळे तोडून चोरटय़ांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले. एका घरातून मौल्यवान वस्तू लंपास केल्या. इतर तीन सदनिकांमध्ये रंग देण्याचे काम सुरू असल्याने चोरटय़ांच्या हाती काही लागले नसल्याचे सांगितले जाते. याच वेळी भगवती दर्शन अपार्टमेंटमध्ये चोरटे शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून गस्तीवर असणारे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांना पाहताच चोरटे इमारतीच्या संरक्षक भिंतीवरून उडय़ा मारत पळू लागले. या वेळी गोगलसिंग बादलसिंग कल्याणीला (हडपसर, पुणे) पोलिसांनी जीव धोक्यात घालून पकडले. घटनास्थळावरून संशयितांनी घरफोडीसाठी वापरलेली हत्यारे तसेच गुन्हा करताना वापरलेली स्विफ्ट डिझायर मोटार जप्त करण्यात आली. दरम्यानच्या काळात इतर संशयितांच्या शोधासाठी परिसरात मोहीम राबविली गेली; परंतु ते मिळून आले नाहीत. दोन्ही सोसायटय़ांमध्ये घरफोडी करणारी एकच टोळी असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी मोहनसिंग परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताकडून हस्तगत केलेली मोटारही चोरीची असल्याचे उघड झाले. या मोटारीबाबत देहू रोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 12:02 am

Web Title: thief active in nashik
टॅग : Robbery
Next Stories
1 अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या बैठकीत छात्रभारतीचे आंदोलन
2 ‘चिता’ नव्हे ‘चितल’ हेलिकॉप्टर!
3 रमेश व सरिता देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार
Just Now!
X