शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी आत्महत्या थांबण्याची चिन्हे दिसत नसून  जिल्ह्य़ात दोन दिवसांत वेगवेगळ्या गावांमध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात बागलाण तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.

गुरूवारी बागलाण तालुक्यातील कंधाणे येथे अशोक दगा काकुळते (५३) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेतला. त्यांच्यावर महाराष्ट्र आणि गिरणा या दोन्ही बँकांचे मिळून चार लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आत्महत्येची तालुक्यात चर्चा सुरू असतांनाच निकवेल येथील कृष्णा भावराव वाघ (४०) या शेतकऱ्याने घरात विष पिऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्यावर गिरणा आणि महाराष्ट्र बँकेसह विविध कार्यकारी संस्थेचे असे एकूण पाच लाखाचे कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. शेतातील घरात कोणी नसताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पत्नी रात्री उशिरा डांगसौंदाणे येथील दुकान बंद करून घरी आल्या असता घडलेल्या प्रकाराने त्यांना धक्का बसला. वाघ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आहेत. वाघ यांची अडीच एकर शेती आहे. आत्महत्येची तिसरी घटना देवळा तालुक्यातील खामखेडा येथे घडली. युवा शेतकरी नारायण पंडित शेवाळे (३९) यांनी कर्जाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. शेवाळे यांनी खामखेडा विविध कार्यकारी सेवा सोयायटीकडून पीक कर्ज४३ हजार रुपये, तर विहीर खोदणे आणि बांधण्यासाठी एक लाख ५० हजार रूपये कर्ज घेतले होते. पीक कर्ज ४३ हजार रुपयांचे व व्याज २४ हजार ४५८ रुपये झाले होते. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत त्यांना पीक कर्ज माफ झाले असले तरी त्यांनी नवीन विहीर खोदकाम, बांधणीसाठी याच सोसायटीकडून मध्यम मुदतीचे दिड लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. दोन ते तीन वर्षांपासून शेतीतून उत्पन्न न मिळाल्यामुळे ते संस्थेचे कर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे  मध्यम मुदतीचे दिड लाख रूपये व्याज भरणे बाकी होते. हे कर्ज ८४ पेक्षा जास्त महिन्याचे असल्याने शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत मध्यम मुदत कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही. दोन ते तीन दिवसांपासून संबंधित रक्कम भरण्याच्या विवंचनेत होते, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. बुधवारी रात्री खामखेडा-सावकी रस्त्यालगतच्या शिवारात त्यांनी अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. या घटनेची माहिती सावकीच्या पोलीस पाटील यांनी देवळा पोलीस ठाण्यास दिल्यानंतर निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.