शहरातील गंजमाळ भागात राहणाऱ्या व्यापाऱ्याला मुलीसह जीवे ठार मारण्याची धमकी देत ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. दूरध्वनीद्वारे खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करत पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. न्यायालयाने या संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गंजमाळ येथील रोटरी हॉलजवळच्या सौभाग्यनगर परिसरात मनीष रिकदास भंडारी (४५) राहतात. विविध व्यवसाय असणारे भंडारी हे सधन कुटुंब म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या कंपन्या तसेच संस्थांमध्ये सेवा-सुविधा देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. या कुटुंबाची माहिती प्राप्त करत संशयिताने त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क साधत तीन-चार दिवसांपासून ४० लाखांच्या खंडणीसाठी तगादा लावला. बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दूरध्वनी करत ‘आम्ही डी गँगची माणसे आहोत, ४० लाख रुपये न दिल्यास तुमच्यासह मुलीला जीवे मारू अशी धमकी दिली. या प्रकाराने भयभीत झालेल्या भंडारी यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठत संशयिताविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. भंडारी यांना बीएसएनएल व अन्य काही क्रमांकांवरून धमकीचे फोन येत असल्याचे निदर्शनास आले. या क्रमांकाचे ‘पॉवर लोकेशन व मोबाइल ट्रेस’ केले असता हे संशयित उत्तर प्रदेश परिसरातील असल्याचे लक्षात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या जोनपूर येथे राहणारा मोहम्मद जाकीर निसार (२५), संत कबीरनगर येथील अली सय्यद शेख व सूरज शामनारायण सहाणे (२२) यांना ताब्यात घेतले. यातील संशयित सूरजची भंडारी यांच्याशी दोन वर्षांपूर्वी काही कामानिमित्त ओळख झाली होती. यातून त्याने भंडारी यांची आर्थिक सुबत्ता हेरत कौटुंबिक माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे संशयितांनी केवळ पैसे मिळविण्याच्या हेतूने भंडारी यांच्याकडे खंडणीची मागणी केली. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले. पोलिसांनी तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या बाबतची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.