तीनही वेटलिफ्टर खेळाडूंना पदके

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पहिल्या ‘खेलो इंडिया’ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनमाडच्या तीनही खेळाडूंना पदके मिळाली. खुशाली गांगुर्डेने सोमवारी रौप्यपदक मिळविल्यानंतर मंगळवारी धनश्री पवारने कांस्यपदक पटकावून दिल्ली गाजवली.

धनश्री ही छत्रे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आणि जय भवानी व्यायामशाळेची खेळाडू आहे. मंगळवारी ५३ किलो वजनी गटात ६६ किलो स्नॅच आणि ८१ किलो जर्क असे १४७ किलो वजन धनश्रीने उचलले. कठोर परिश्रम आणि नियमित सरावाच्या जोरावर धनश्रीने हे यश संपादन केले. पूजा परदेशीनेही कांस्यपदक मिळवीत आनंदोत्सवात भर टाकली. ५८ किलो वजनी गटात पूजाने ६५ किलो स्नॅच आणि ८२ किलो जर्क असे एकूण १४७ किलो वजन उचलले.

सोमवारी छत्रे विद्यालयाच्याच खुशाली गांगुर्डेने रौप्यपदक मिळविले. मनमाडमध्ये मुलींना वेटलिफ्टिंगमध्ये वळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या कष्टाचे फलित होत आहे.

अलीकडेच राष्ट्रकुल युवा स्पर्धेत निकिता काळेने सुवर्ण मिळवून मनमाडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविले होते. अशी कामगिरी करणारी ती नाशिक जिल्ह्य़ाची पहिलीच खेळाडू ठरली. आता ‘खेलो इंडिया’ या महत्त्वपूर्ण क्रीडा महोत्सवातही मनमाडच्या मुलींनी यशाची मालिका कायम राखत सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. या मुलींचे छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी. जे. धारवाडकर, अध्यक्ष पी. जी. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे, उपमुख्याध्यापक आर. एन. थोरात,पर्यवेक्षक संदीप देशपांडे, जय भवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, मोहन गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.