आणखी तीन जण जखमी; धोकादायक वीज तारांचा प्रश्न ऐरणीवर

सिडकोत घरांलगतच्या खांबावरील वीज तारा स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असल्याची बाब पुन्हा सोमवारी घडलेल्या एका दुर्घटनेतून समोर आली. तिसऱ्या मजल्यावर गच्चीत केबलचे काम करणारे तीन जण वीज वाहिनीचा धक्का लागून जखमी झाले. महत्त्वाची बाब म्हणजे दत्त चौक परिसरात महावितरणच्या कार्यालयालगत ही घटना घडली.

दत्त चौकात तीन मजली इमारतीत बाळकृष्ण घुगे यांच्या केबल व्यवसायाचे कार्यालय आहे. त्यांचे जावई हा व्यवसाय सांभाळतात. इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील गच्चीत केबलचालक कमलेश सोनवणे, नीलेश सोनवणे व अन्य एक कामगार केबल जोडणीचे काम करीत होते. त्यावेळी अकस्मात वीज तारांशी स्पर्श होऊन त्यांना जोरदार झटका बसला.

यावेळी आरडाओरड झाल्यामुळे आसपासच्या नागरिकांनी धाव घेतली. जखमींना सावधगिरी बाळगून बाजूला काढले आणि तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कमलेश सोनवणे ५५ टक्के भाजले तर उर्वरित कामगार किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती समजल्यावर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वीज तारांशी कामगाराचा संपर्क आल्यानंतर पुरवठा त्वरित बंद झाल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.

दत्त चौकात महावितरणचे कार्यालय आहे. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली. हा प्रश्न जटिल बनण्यामागे अधिकची जागा व्यापून झालेली बांधकामे कारणीभूत ठरली.

अतिक्रमणांमुळे धोका वाढला

अतिशय दाटीवाटीच्या सिडको वसाहतीत धोकादायक वीज वाहिन्यांमुळे आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यात काहींना प्राणही गमवावे लागले. सिडकोतील अंतर्गत व बर्हिगत रस्त्यांवरील घर व दुकानांवरील भागातील गच्ची आणि खांबावरील वीज वाहिन्यांमध्ये अनेक ठिकाणी चार ते पाच फूटही अंतर नाही. ही बाब अपघातांना कारक ठरते. अनेकांनी अतिक्रमण करीत घरांची उभारणी केल्यामुळे हे अंतर कमी झाल्याचे सांगितले जाते. नियमानुसार बांधलेली घरे आणि अतिक्रमित घरे यांच्यातील वीज तारांमध्ये वेगवेगळे अंतर असल्याचे लक्षात येते. वरच्या मजल्यावरील रहिवाशांना वीज तारांचा अंदाज येत नाही. कधीकधी अनावधानाने तारांना स्पर्श होऊन अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. सिडकोतील धोकादायक वीज तारा भूमिगत करण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून होत आहे. काही अंशी या वाहिन्या भूमिगत झाल्या असल्या तरी बऱ्याचशा भागात घराजवळून मार्गस्थ होणारे वीज तारांचे जाळे ‘जैसे थे’ आहे.

४७ टक्के वीज वाहिन्या भूमिगत

सिडको परिसरात एकूण वीज वाहिन्यांपैकी आतापर्यंत ४७ टक्के वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. या कामांसाठी मागील तीन वर्षांत आपण दोन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्यात अति संवेदनशील वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम करण्यात आले. उर्वरित वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पुढील टप्प्यात करण्यात येईल. -आ. सीमा हिरे