पोलिसांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ निवृत्त अधिकाऱ्यांचा मूक मोर्चा

दोन गटांमधील वाद सोडविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात तपास यंत्रणेने वेगाने चक्रे फिरवत तीन संशयितांना अटक केली. न्यायालयाने मुख्य संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इतर दोन संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्यायालयात नेण्यात आले. काही दिवसांत पोलिसांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या माजी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन प्रभावशाली कायदा करण्याची मागणी केली. मोर्चात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले. पोलिसावरील हल्ल्याच्या प्रकरणात कायदेशीर कारवाई करताना राजकीय व इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये, असे साकडेही संबंधितांनी शासनाला घातले आहे.

गेल्या काही दिवसात नाशिकसह राज्यात पोलिसांना मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नाकाबंदी दरम्यान चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला होता. द्वारका चौकात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली. पंचवटी परिसरात पुन्हा तसाच प्रकार घडला. चारचाकी रोखल्याचा राग येऊन अल्पवयीन युवकाने वाहतूक पोलिसाला दमदाटी करून शिवीगाळ केली. या घटनाक्रमामुळे पोलीस कुटुंबीयांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालविली जाणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री दौरा आटोपून मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या काही तासात पुन्हा पोलिसावर हल्ल्याचा प्रकार घडला. भद्रकाली पोलीस ठाण्याचे विजय मोरे हे बिटमार्शल गस्त घालत होते. यावेळी ठाकरे गल्लीसमोरील पिंपळ चौकात काही युवकांमध्ये वाद सुरू असल्याचे निदर्शनास आले. मोरे यांनी दुचाकी थांबवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्यातील काहींनी थेट त्यांच्यावर हल्ला चढविला. मोरे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने ते खाली कोसळले. दरम्यानच्या काळात संशयितांनी पलायन केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी मोरे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत यंत्रणेने संशयितांचा युद्धपातळीवर शोध घेण्यास सुरुवात केली. रात्रभर शोधमोहीम राबवून सागर संजय शिंदे या मुख्य संशयितासह दोन अल्पवयीन युवक अशा तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांवरील हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी मोर्चाच्या माध्यमातून उमटले. निवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठानच्यावतीने पोलीस मुख्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.

पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब पोटे, उपाध्यक्ष चंद्रकांत बनकर, मधुकर वसावे, शांताराम महाजन, रमेश पाटील आदी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात दीडशेहून अधिक निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील सदस्यही सहभागी झाले. कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. पोलिसांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांविरुद्ध स्वसंरक्षणार्थ शस्त्राचा वापर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. या स्वरूपाचे खटले जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुंडांना सोडविण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी

पोलिसांवर हल्ला करणारा गुन्हेगार कोणत्याही जात, धर्म, पक्ष वा संघटनेचा असो, त्याच्याविरुद्ध कारवाई करताना राजकीय व्यक्ती वा इतर क्षेत्रातील कोणीही हस्तक्षेप करू नये. तसा कोणी प्रयत्न केल्यास पोलिसांनी तो जुमानू नये, असे स्पष्ट आदेश यंत्रणेला देण्याची मागणी करण्यात आली. या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय किंवा इतर क्षेत्रातील व्यक्तीविरुद्ध सबळ पुरावा तयार करण्यासाठी त्यांचे बोलणे, फोनकॉल्स, धमकी याचे रेकॉर्डिग करून पोलीस ठाण्यातील डायरीत नोंदी करून असे कृत्य करणाऱ्याविरुद्धचा प्रकार दखलपात्र गुन्हा ठरवून कार्यवाही करण्याची गरज आहे. ३५३ हे कलम अजामीनपात्र करून सात वर्षांची कमीतकमी शिक्षा असणारे असावे, याकडे निवृत्त पोलीस कल्याण प्रतिष्ठानने लक्ष वेधले.