नाशिकरोड परिसरातील जयभवानी रस्त्यावर मागील आठवडय़ात टोळक्याने एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली. या प्रकरणातील एक संशयित अद्याप फरार आहे. या संशयितांना पकडण्यात यंत्रणेला यश मिळाले असले तरी दुहेरी खून प्रकरणातील फरार संशयित पी. एल. ग्रुपचा म्होरक्या आणि नगरसेवकपूत्र भूषण लोंढे अद्याप हाती लागू शकलेला नाही. तसेच विनयनगर भागातील हाणामारी प्रकरणातील नगरसेवकपुत्र आकाश साबळे कित्येक दिवसांपासून सापडलेला नाही.
टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची जाळपोळ, लूटमार, खून, सोनसाखळी चोरी या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना पोलिसांचा वचक संपल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे. मागील आठवडय़ात मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे रणजित जगशरण मंगवाना यांची जयभवानी रस्त्यावरील जैन भवनसमोर चार संशयितांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पत्नी गीता यांनी रोहित माले ऊर्फ डिंगम याच्यासह चार जणांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस संशयितांच्या मागावर होते.
गुन्हे शाखा युनिटचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना संशयित इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सानप यांनी सहकाऱ्यांसमवेत इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. बुधवारी मध्यरात्री रोहित माले, विनोद साळवे आणि संजय बेग हे संशयित फिरत असताना त्यांना अटक करण्यात आली. संशयितांनी खुनाची कबुली दिली असून त्यांनी गुन्ह्य़ात वापरलेले पिस्तुल मिळवण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहे. पकडलेल्या संशयितांना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून एकाचा शोध सुरू आहे.