हल्ल्यात वनपाल जखमी

नाशिक शहरातील सावरकरनगर नागरी वसाहतीत पुन्हा एकदा शिरकाव करणाऱ्या बिबटय़ाला रविवारी आठ तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले. बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न होत असताना त्याच्या हल्ल्यात वनपाल जखमी झाले. बघ्यांची गर्दी, गोंधळ यामुळे बिबटय़ाला पकडण्याची मोहीम लांबली. पकडलेला बिबटय़ा चार वर्षांचा नर आहे. मागील महिन्यात याच भागात बिबटय़ाने शिरकाव करत गोंधळ उडवून दिला होता.

गंगापूर रस्त्यालगत गोदावरी काठावर सावरकरनगर ही उच्चभ्रूंची वसाहत आहे. रविवारी स्थानिकांनी पुन्हा बिबटय़ाचा थरार अनुभवला. सकाळी साडेआठच्या सुमारास परिसरातील एका सीसीटीव्हीत बिबटय़ा दिसला. किराणा दुकानासमोर बसलेला बिबटय़ा नंतर कॉलनी रस्त्यातून मार्गस्थ झाल्याचे दिसले. हे समजल्यानंतर नागरिकांनी पोलिसांसह वन विभागाला माहिती दिली. सुटीचा दिवस असल्याने कॉलनीत शांतता होती. बिबटय़ा आल्याचे समजताच धावपळ उडाली. स्थानिकांनी दारे बंद करत गॅलरी, गच्चीत धाव घेतली. वन विभागाचे पथक दाखल झाले. कॉलनी परिसरात शोधमोहीम सुरू झाली. युवक, पादचारी, वाहनधारक जमू लागले. काही वेळात मोठी गर्दी झाली. दोन ते तीन तास शोध घेऊनही बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. बघ्यांच्या गोंधळामुळे बिबटय़ा कुठे तरी दडी मारून बसला होता. पुरेसे पोलीस नसल्याने जमावाला नियंत्रित करणे वन विभागाला अशक्य झाले. अखेर पथकाने काही काळ काम थांबविले. गर्दी काहीशी कमी झाल्यानंतर एका बंगल्याच्या आवारातून बिबटय़ा अकस्मात बाहेर आला. वन पथकाने त्याला बेशुद्ध करण्याची तयारी केली. बिबटय़ा आसपासच्या बंगल्यात भटकंती करत होता. बघ्यांचा गोंधळ पुन्हा सुरू झाला. यामुळे बिथरलेल्या बिबटय़ाने वनपाल रवींद्र सोनार यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले.

पोलिसांनी जमावाला पिटाळल्यानंतर पथकाने नव्याने तयारी केली. बिबटय़ा ज्या बंगल्याजवळ बसला होता, त्याच्या आसपासच्या परिसरात जाळ्या लावून तो निसटणार नाही, याची दक्षता घेतली. त्यानंतर ब्लो पाइपद्वारे इंजेक्शन मारून बिबटय़ाला बेशुद्ध केले. नंतर लगेच पिंजऱ्यात टाकून त्याला घटनास्थळावरून नेण्यात आले. बिबटय़ा जेरबंद झाल्यानंतर सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, बिबटय़ाला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे वन विभागाच्या मोहिमेत अडथळे आले. मागील महिन्यात बिबटय़ाला पकडताना असेच घडले होते.