दिंडोरी तालुक्यात बिबटय़ाचा मुक्त संचार कायम आहे. परमोरी येथे वडिलांसोबत शेतात काम करणाऱ्या ११ वर्षांच्या मुलावर बिबटय़ाने हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. त्याच्यावर दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि नंतर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता तो खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिंडोरी तालुक्यात कादवा नदीकाठ परिसरात बिबटय़ाचा मुक्त संचार आणि हल्ल्याचे अनेक प्रकार आधीही घडलेले आहेत. हल्ल्यात काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. एखादी घटना घडेपर्यंत वन विभागाकडून बिबटय़ाला पकडण्यासाठी कार्यवाही केली जात नसल्याची ग्रामस्थांची भावना आहे.

रविवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मौजे परमोरी येथे बिबटय़ाच्या हल्ल्याची घटना घडली. मॅकडोनाल्ड कारखान्याच्या मागील बाजूला राजेंद्र काळोगे यांचे शेत आहे. शेतात शुभम (११) हा  वडिलांसोबत काम करत होता. यावेळी उसाच्या शेतातून बिबटय़ाने अकस्मात हल्ला केला. मान, छातीवर चावा घेतल्याने गंभीर जखमा झाल्या. आई-वडिलांनी तातडीने आरडाओरड केल्यामुळे बिबटय़ाने पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या शुभमला प्रथम िदडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. आता त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुस्थितीत असल्याचे वन विभागाचे अधिकारी जी. पी. गांगुर्डे यांनी सांगितले.

बिबटय़ाला पकडण्यासाठी तीन पिंजऱ्यांची उपाययोजना

या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, वन विभागाने परमोरी परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले. तसेच ‘कॅमेरा ट्रॅप’ लावून बिबटय़ाचा माग काढला जात आहे. वन विभागामार्फत दिंडोरी तालुक्यात गस्त वाढविण्यात आली आहे. ग्रामस्थांनी काय काळजी घ्यावी, याबद्दल जनजागृती केली जात असल्याचे गांगुर्डे यांनी सांगितले.