भगूर आणि राहुरी शिवारात काही दिवसांपासून पाळीव जनावरांचा फडशा पाडणारा बिबटय़ा गुरुवारी मध्यरात्री मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. पिंजऱ्याभोवती जमा होत परिसरातील नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.

भगूर-राहुरी शिवार दारणा नदीच्या काठावर असल्यामुळे दाट झाडी-झुडपे या परिसरात आहेत. त्याचा फायदा घेत १५ दिवसांपासून बिबटय़ा या परिसरात लपला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी दिली होती. बिबटय़ाने गाय, वासरू, शेळी, कुत्रे, पारडू यांचा फडशा पाडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांनी बिबटय़ाला पकडण्यासाठी  परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी वन विभागाकडे केली होती.

बुधवारी वन विभागाने परिसरातील अर्जुन कापसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला. त्यानंतरही  बिबटय़ाने विक्रम आवारे यांच्या शेतातील गायीचा फडशा पाडला. गुरुवारी पहाटे बिबटय़ाची डरकाळी ऐकू येऊ लागल्याने ग्रामस्थांनी कापसे यांच्या मळ्याकडे धाव घेतली असता बिबटय़ा पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात आले.

राहुरीचे सरपंच संपत घुगे यांनी वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याशी संपर्क साधून बिबटय़ा जेरबंद झाल्याची माहिती दिली. बिबटय़ाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. कोणी पिंजऱ्याच्या बाजूला उभे राहून सेल्फी काढत होते, कोणी काडय़ा टोचून त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे चवताळलेल्या बिबटय़ाने पिंजऱ्यात धडका दिल्याने तो जखमी झाला. अखेर गर्दीला बाजूला करीत वन विभागाने बिबटय़ाचा पिंजरा सुरक्षितरीत्या बाहेर काढला. बिबटय़ाचा बछडा अजूनही परिसरात असल्याची चर्चा असून पळसे, नाणेगाव, धामणगाव या भागातही पिंजरे लावावेत अशी मागणी करण्यात आली आहे.