19 October 2019

News Flash

मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी २५० पोलिसांचा पहारा

लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

अंबड येथील मतमोजणी केंद्राबाहेर अशी सुरक्षा व्यवस्था आहे.

नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे अंबड येथील ज्या अन्न महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहे, तिथे सुरक्षिततेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि शहर पोलिसांचे जवळपास २५० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा खडा पहारा देत आहेत. मतदान यंत्राच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी श्वान पथक, उंच टेहळणी मनोरे, बंकर आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी यामध्ये बरेच अंतर असल्याने या काळात मतदान यंत्रांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. विरोधी पक्षांचे राज्यातील काही नेते मतदान यंत्रात गडबड होण्याची शक्यता बोलून दाखवीत आहेत. संबंधितांचे आक्षेप खोडून काढण्यासाठी निवडणूक यंत्रणा ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड येथील अन्न महामंडळाच्या मध्यवर्ती गोदामात होणार आहे. मतदानानंतर राजकीय पक्ष, उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान यंत्र स्ट्राँग रूममध्ये ठेवली गेली. या संपूर्ण परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून मतमोजणी केंद्रावर सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन आदींचे नियोजन करण्यात आले आहे. या परिसरात निवडणूक कामासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारीवगळता कोणालाही प्रवेश दिला जात नाही. संबंधितांनाही ओळखपत्र तपासून प्रवेश मिळतो. अंबड गोदामाच्या अवतीभवती कोणी विनाकारण थांबणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.

मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉग रूमसाठी अखंडित वीज पुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्राँग रूमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश ‘महावितरण’ला देण्यात आले आहेत.

मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी दररोज आठ तास यानुसार तीन राजपत्रित अधिकारी पूर्णवेळ या ठिकाणी मुक्काम करत असून या परिसराची सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय आणि राज्य राखीव पोलिसांसह शहर पोलीस सांभाळत आहेत. तिन्ही दलाचे मिळून एकूण २५० अधिकारी-जवानांचा ताफा अहोरात्र पहारा देत असल्याचे आनंदकर यांनी नमूद केले. अग्निशमन दल, श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे.

First Published on May 9, 2019 10:09 am

Web Title: tight police security for election in nashik