11 December 2019

News Flash

सभेच्या बंदोबस्ताचीच अधिक चर्चा

मोदी यांच्या सभेत आंदोलन किंवा तत्सम प्रकार घडू नये म्हणून यंत्रणेने खबरदारी घेतली.

सभास्थानी पोलिसांची मनोऱ्यावरून नजर.

नाशिक : आंदोलनाच्या धसक्याने टळटळीत उन्हात प्रचंड बंदोबस्त, सापांच्या भीतीने सर्पमित्र तैनात, सभामंडपात येणाऱ्यांची कसून तपासणी, काळ्या टोप्यांसह पाण्याच्या बाटल्या, कंगवा, तत्सम वस्तूंची जप्ती, त्यामुळे उडणारे खटके.. अशा वातावरणात सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत नेत्यांनी कधी चारोळ्या, तर कधी तिखट शब्दांत विरोधकांवर प्रहार केले. खुद्द मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात करत नाशिकच्या सात रंगांचे वैशिष्टय़े कथन केले. समारोपावेळी गाव गाव, शहर शहर, घराघरांसह शेतीमध्ये, शिक्षक-प्राध्यापक, अभियंता-डॉक्टर आदींचा उल्लेख करत संपूर्ण देश चौकीदार असल्याचा प्रतिसाद मिळवला. कोणतेही विघ्न न येता सभा शांततेत पार पडल्याने पोलीस यंत्रणेचा जीव भांडय़ात पडला.

कांदा, टोमॅटो आणि तत्सम कृषिमाल उत्पादित होणाऱ्या परिसरातील या सभेवर आंदोलनाचे सावट होते. काही कांदा उत्पादकांनी पंतप्रधानांना भेटू देण्याची, तर निवृत्तिवेतनधारकांनी आंदोलनाची परवानगी मागितली होती. मोदी यांच्या सभेत आंदोलन किंवा तत्सम प्रकार घडू नये म्हणून यंत्रणेने खबरदारी घेतली. मंडपाच्या सभोवताली उन्हातान्हात पोलीस तैनात होते. मनोऱ्यातून नजर ठेवण्यात येत होती. पडीक माळरानावरील सभेत सर्पाच्या भीतीवर सर्पमित्र आणि कापडी आच्छादन अर्थात मॅटचे पांघरूण घातले गेले. जोपूळ रस्त्यावरील सभास्थानापासून एक ते दीड किलोमीटरवर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथून पायी येणाऱ्यांची मंडपात तपासणी करण्यात आली. व्यासपीठासमोरील आसन व्यवस्था अतिविशेष पासधारकांसाठी राखीव होती.

मोदी यांचे आगमन होण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन, महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, दिंडोरीच्या डॉ. भारती पवार, आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी खिंड लढविली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चारोळ्यांद्वारे विरोधकांना चिमटे काढत उष्म्यामुळे त्रस्त झालेल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणले. खुद्द पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिखट शब्दांत विरोधकांवर हल्लाबोल केला. मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. त्याकरिता ‘टेलिप्रॉम्टर’चा आधार घेतल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्र्यांचे आधी भाषण झाले. मोदी यांची परवानगी घेऊन ते नंदुरबारकडे मार्गस्थ झाले. हा धागा पकडून पंतप्रधानांनी फडणवीस यांचे कौतुक केले. निवडणूक काळात खरे तर राजशिष्टाचाराची गरज नसते. प्रचारासाठी फिरावे लागते. फडणवीस हे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते असल्याचे प्रशस्तीपत्रक मोदी यांनी दिले.

कृषिमालाच्या प्रश्नात काँग्रेस आघाडी सरकार चलाखी करायचे. व्यापारी, मध्यस्तांच्या हिताचे निर्णय घेतले जात असत. आम्ही व्यापाऱ्यांची साखळी मोडून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीला प्रोत्साहन दिले. किमान निर्यातमूल्य शून्य करत प्रोत्साहन अनुदान दुप्पट करून निर्यातीला चालना दिल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. विरोधकांकडून महाराष्ट्राचे पाणी पळवून नेण्याविषयी चाललेल्या आक्षेपाला पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी असे कोणीही नेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. फडणवीस यांनी काँग्रेसच्या काळातील करार रद्द करून भाजपने नवीन करार केल्याचे सांगितले. नार-पार नदीजोड प्रकल्पातून १७ प्रकल्पांमधून नाशिकच्या दुष्काळी भागाला पाणी दिले जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ११ हजार कोटी रुपये दिल्याचे सांगत विरोधकांचे आरोप तथ्यहीन असल्याचा दावा केला.

सभा बऱ्याच उशिराने सुरू झाल्याने पंतप्रधानांचे भाषण सुरू झाल्यावर काहींनी मंडपातून बाहेर पडणे पसंत केले.

उपस्थितांचे ‘कॅमेराप्रेम’

सभेला उपस्थित नागरिकांचे ‘कॅमेराप्रेम’ ठळकपणे दिसले. कॅमेरा आपल्याकडे वळल्यानंतर घोषणा दिल्या जात. त्याची दिशा बदलली की, आपसूक सर्व शांत होत असे. असे अनेकदा घडले. गर्दीत ‘मै हूं चौकीदार’, ‘भारताचा विकासपुरुष’ अशा टोप्या, फलकही झळकत होते. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हरिश्चंद्र चव्हाणांची नाराजी दूर?

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज खासदार हरिश्चंद्र चव्हाण पंतप्रधानांच्या सभेत थेट व्यासपीठावर चमकले. त्यांची नाराजी भाजपने दूर केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. तिकीट न मिळाल्याने समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर तोफ डागली होती. प्रचारात समर्थक सहभागी होत नसल्याने अन्य पदाधिकारी धमकावत असल्याचे आरोप केले होते. पंतप्रधानांच्या सभेला ते उपस्थित राहतील याची कोणाला शाश्वती वाटत नव्हती. परंतु इतर नेते येण्यापूर्वीच चव्हाण हे व्यासपीठावर पोहचले. त्यांना खास जागाही दिली गेली.

First Published on April 23, 2019 2:48 am

Web Title: tight security in nashik ahead of lok sabha election
Just Now!
X