नाशिक : करोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू के ले असले तरी शहरातील भाजीबाजार, किराणा दुकानांमधील गर्दीवर कोणताही परिणाम न झाल्याने घाऊक-किरकोळ व्यापारी संघटनांनी सोमवारपासून दुपारी चारनंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पहिल्या दिवशी व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. परंतु, नागरिकांकडून निर्बंधांची पर्वा न करता बाजारपेठ, किराणा दुकानांमध्ये गर्दी करणे सुरूच राहिले. टाळेबंदीची टांगती तलवार असल्याने नागरिकांकडून अधिकाधिक किराणा माल आणि अन्न धान्याची खरेदी केली जात आहे. जिवनावश्यक खरेदीच्या नावाखाली नागरीक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडत आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी काही व्यापारी संघटनांनी काही दिवस जिवनावश्यक वस्तुंची दुकाने बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारपासून दुपारी चारनंतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र चेंबरनेही निर्णयाला पाठिंबा दर्शविला. या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सकाळपासून भाजीबाजार परिसरात नागरीकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. ठराविक वेळेपर्यंतच भाजीबाजार सुरू राहणार असल्याने ही गर्दी झाली. किराणा दुकानांमध्येही ग्राहकांनी गर्दी केली. अनेक ग्राहकांकडून नेहमीपेक्षा अधिक किराणा खरेदी करण्यात आला. दुपारी साडे तीननंतर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. काही दुकाने मात्र वेळेची मर्यादा संपल्यानंतरही उघडी होती. सातपूर, सिडको, नाशिकरोड परिसरात वेळेच्या या निर्बंधाला प्रतिसाद मिळाला असला तरी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत संमिश्र चित्र दिसले.

 

पोलिसांची नाकाबंदी

विनाकारण भटकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी शहर पोलिसांनी १३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी के ली आहे. या ठिकाणी विनाकारण बाहेर पडणारे, मुखपट्टीचा वापर न करणारे यांची चौकशी करून त्यांची जागीच प्रतिजन चाचणी करण्यात येत आहे. तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २० हून अधिक बाधित आढळले. त्यांना तातडीने करोना उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.