मनुष्यबळाचा अभाव आणि पक्षातंर्गत विरोध

नाशिक : करोना रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी काळजी केंद्रांची उभारणी करण्यात येत असली तरी त्याप्रमाणे मनुष्यबळ मिळत नसल्याने या केंद्रांसमोर संकट उभे राहिले आहे. जेलरोड येथील राजराजेश्वारी मंगल कार्यालयात सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांसाठी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी स्वखर्चाने शंभर खाटांचे करोना काळजी केंद्र सुरु केले.परंतु,  महिनाभर लाखो रुपये खर्च करुनही वैद्यकीय कर्मचारी न मिळाल्यामुळे अखेर त्यांच्यावर हे केंद्र बंद करण्याची वेळ आली. स्वपक्षातील लोकांचा विरोध आणि प्रशासनाचा नाकर्तेपणा यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी नमूद केले.

नाशिकरोडसह जेलरोड परिसरात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जेलरोडच्या उपचार केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसाला शंभर आहे. बिटको करोना रुग्णालयातही नवीन रुग्णांसाठी खाटा शिल्लक नाहीत.

रुग्णांना उपचारासाठी भटकावे लागत असून खाट न मिळाल्यामुळे रुग्णांचे प्राण जात आहेत. नागरिकांची गरज लक्षात घेऊन नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी राजराजेश्वारी मंगल कार्यालयात शंभर खाटांचे करोना केंद्र सुरु केले. त्यात महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारले होते. स्वागत कक्षही उभारला होता. सौम्य लक्षण असलेल्या करोना रुग्णांबरोबरच विलगीकरण करण्यास सांगितलेल्या रुग्णांचीही येथे व्यवस्था करण्यात आली होती. बिटको करोना रुग्णालयाचे प्रमुख डॉ. जितेंद्र धनेश्वार यांनीही येथे पाहणी करुन सकारात्मक अहवाल दिला होता.

या केंद्रासाठी वैद्यकीय कर्मचारी मिळावेत, याकरिता संगमनेरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त मनोज घोडे यांसह  अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. महिनाभर प्रयत्न करुनही आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या संगमनेरे यांनी या केंद्रासाठी भाड्याने आणलेले पलंग, गाद्या, उशा आदी साहित्य परत केले. या खर्चाबरोबरच वीज देयक, कार्यालयाचे भाडे त्यांना नाहक भरावे लागले. लाखो रुपये खर्च करुनही केंद्र कार्यरत न झाल्यामुळे त्यांनी प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली. हे केंद्र येथे कार्यरत होऊ नये यासाठी स्वपक्षीयातील काहींनी विरोध केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. करोना रुग्णांना सहाय्य करण्यास, त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आपण आजही कटीबध्द असल्याचे नमूद करतानाच प्रशासन आणि सरकारकडून अपेक्षित सहकार्य आणि मदत मिळत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. संगमनेरे हे प्रभाग सभापतीही होते. या प्रभाग १८ मध्ये तीन नगरसेवक भाजपचे आहेत. त्यांचे अंतर्गत कलह असल्याने त्याचा फटका संगमनेरेंनी सुरु केलेल्या शंभर खाटांच्या करोना उपचार केंद्राला बसला.