मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांचे मत

शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी ‘ट्रायथलॉन’ ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी मनाची एकाग्रता आणि शरीर आणि मन यांचा समन्वय आवश्यक आहे, असे मत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी व्यक्त केले. फ्रान्समध्ये आयोजित खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ किताब पटकावल्याबद्दल डॉ. सिंगल यांचा येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

विद्यापीठाच्या शैक्षणिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन होते. यावेळी डॉ. सिंगल यांनी कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे असल्याचे नमूद केले. प्रत्येकाच्या आयुष्यात अडीअडचणी असतात. मात्र सकारात्मक विचारांनी चांगले ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हमखासपणे यश मिळते. त्यात तंदुरुस्त शरीर आणि एकाग्र चित्त मन यांचा समन्वय आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये यश मिळविण्याची क्षमता असते. ही क्षमता प्रत्येकाने आपण स्वत:हून ओळखायची असते. त्यासाठी सतत चिकाटीने प्रयत्न करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शरीराची निगा राखणे आणि ते तंदुरुस्त ठेवणेही तितकेच अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. स्पर्धेची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष स्पर्धेतील अनुभव त्यांनी कथन केला. कुलगुरू डॉ. वायुनंदन यांनी पोलीस खात्यातील ताणतणावाच्या नोकरीत असतांनाही बहुआयामी डॉ. सिंगल यांनी बजावलेली कामगिरी इतरांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. सिंगल यांचा मुक्त विद्यापीठातर्फे शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा खरे यांनी केले. विद्यापीठाचे सहाय्यक ग्रंथपाल प्रकाश बर्वे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे यांनी आभार मानले.