नाशिक : करोनाबाधितांवरील उपचारात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोसिलीझुमॅब या औषधाचा सध्या जिल्ह्य़ात तुटवडा जाणवत आहे.

राज्य स्तरावर करोनाग्रस्त रुग्णांचा आलेख उंचावत असताना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. करोनाग्रस्तांवर उपचार करताना रेमडेसीवीरसह ‘टोसीलीझुमॅब’ इंजेक्शन रोगप्रतिकारक शक्ती सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा औषध कंपनीने केला. या इंजेक्शनची किंमत ३० हजार रुपये असताना त्याचा काळाबाजार होऊ लागला. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच महापालिका हद्दीत प्रकृती चिंताजनक असलेल्या करोनाग्रस्तांसाठी सध्या टोसीलीझुमॅब या औषधाचा साठा उपलब्ध नसल्याचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांनी  सांगितले.  श्वसनास अडचण, प्रकृती गंभीर आहे, अशा रुग्णांकरिता हे इंजेक्शन मागविण्यात आले होते. १० ते १५ इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात आले. रुग्णालयाकडून ३० हजार रुपयांना त्याची विक्रीही झाली. परंतु, वेगवेगळ्या वैद्यकीय संशोधनात त्याचे दुष्परिणाम उघड होण्यास सुरुवात झाली. रोगप्रतिकारशक्ती वाढत असली तरी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कंपनीने औषध उत्पादन थांबवले आहे. ऑक्सिजन थेरेपी उपयुक्त असल्याने त्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना जिल्हा रुग्णालय किंवा करोना समर्पित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यामुळे प्राथमिक, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या इंजेक्शनची गरज नसल्याकडे डॉ. सैंदाणे यांनी लक्ष वेधले.

३० हजारांचे इंजेक्शन लाखापर्यंत

महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी इंजेक्शन उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने करताच त्याचा काळाबाजार सुरू झाल्याचे सांगितले. ३० हजारांचे इंजेक्शन काळ्या बाजारात लाखापर्यंत पोहचले. याविषयी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या. दरम्यान, उत्पादन उपयुक्त नसल्याचे कंपनीने सांगत पुरवठा थांबवला. गरज असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून हे  औषध मागविण्यात येते. आतापर्यंत १५ इंजेक्शनचा वापर करण्यात आल्याचे डॉ. नागरगोजे यांनी नमूद केले.