नोटाबंदीमुळे भाव घसरले; शेतकऱ्यांकडूनच पिके उद्ध्वस्त

जवळपास दोन महिने प्रतीक्षा करूनही टोमॅटोच्या दरांत वाढ होण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटोची उभी रोपे उखडून फेकण्यास सुरूवात केली आहे. निश्चलनीकरणाआधी घाऊक बाजारात ६ ते ७ रुपये किलोचा टोमॅटोचा भाव कालांतराने ५० पैसे ते दीड रुपयांपर्यंत गडगडला. त्यातून काढणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने रोपांवर औषध फवारणी व तत्सम खर्च वाढविण्यापेक्षा संबंधितांना नाईलाजास्तव हा मार्ग पत्करावा लागल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात फेरफटका मारल्यानंतर ठिकठिकाणी शेतीच्या बांधावर टोमॅटोची रोपे पडलेली दृष्टिपथास पडतात. तशीच स्थिती काही बाजार समितींच्या आवारात आहे. विक्रीसाठी आणलेल्या मालास ग्राहक मिळत नसल्याने घोटी बाजारात तो गुराढोरांना खाण्यासाठी फेकला जात आहे. नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागवड करणारे हजारो शेतकरी या घसरणीत भरडले गेले. १२ एकरमध्ये टोमॅटो लागवड करणारे दिंडोरीच्या इंदोरे गावचे कृष्णा गायकवाड हे त्यापैकीच एक. दरवाढीची आशा मावळल्याने त्यांनी आपल्या टोमॅटो शेतीवर नांगर फिरवला. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेतला. नाशवंत फळभाजी असल्याने शेतकरी तो जवळ ठेवू शकत नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी भाव पाडले. जुन्या नोटा माथी मारल्या. सध्या एक ते दीड रुपये दर घेऊन काय करणार, असा त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण, एक जाळी (२० किलो) टोमॅटो काढणीला १५ रुपये मजुरी लागते. ही जाळी बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च १५ रुपये आहे. हाच एकूण खर्च ३० रुपये असताना २० किलोच्या जाळीला त्यापेक्षा कमी भाव मिळतो, अशी व्यथा लखमापूरचे संदीप मोगल, वणीचे धीरज तिवारी रासेगावचे बालाजी पवार, आबासाहेब अपसुंदे हे शेतकरी मांडतात.

टोमॅटो लागवडीसाठी एकरी साधारणत: ७० ते ८० हजार रुपये खर्च आहे. लागवडीपासून ७० ते ८० दिवसात पीक सुरू होते. दरवर्षी टोमॅटो लागवडीतून एकरी दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न मिळायचे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाला. हवामान पोषक होते. त्यामुळे रोगांचा प्रार्दुभाव फारसा नाही आणि उत्पादनही वाढले.

परंतु, दोन महिन्यातील बाजारभावाने शेतकरी हबकले. ही रोपे सांभाळायची तर औषधासह तत्सम खर्च आणि मेहनत करावी लागणार. त्याचे मोल मिळण्याची आशा मावळल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी टोमॅटोची रोपे उखडून फेकत असल्याचे चित्र आहे.

मागील काही वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात टोमॅटो शेती अध्र्यावरच सोडून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

एकत्रित परिणाम

पाकव्याप्त काश्मीरमधील लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानात बंद झालेली निर्यात, निश्चलनीकरणाचा व्यापारी वर्गाने घेतलेला गैरफायदा आणि विपूल उत्पादन या सर्वाचा एकत्रित फटका टोमॅटोसह अन्य कृषिमालास बसला. दरवर्षी पाकिस्तानात दररोज ५० मालमोटार इतका टोमॅटो पाठविला जातो. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर ही निर्यात बंद झाली. बांग्लादेश व दुबई येथे नेहमीप्रमाणे निर्यात झाली नाही. देशात इतर भागात विपूल प्रमाणात उत्पादन झाल्याने नाशिकसह राज्यातील टोमॅटोच्या मागणीत कमालीची घट झाल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

पुरवठा व्यवस्था मजबुतीची निकड

बाजार समित्यांमुळे राज्यात कृषि मालाची खुली वितरण व्यवस्था विकसित झाली नाही. पुरवठा व्यवस्थेतील साखळी मजबूत झाल्यास अतिरिक्त माल दूरवरच्या बाजारपेठेतही पाठविता येईल. टोमॅटोला हमी भाव जाहीर केल्यास व्यापारी तो खरेदी करणार नाहीत. कापूस व सोयाबीनला हमी भाव आहे. परंतु, तो पदरात पाडून घेण्यासाठी लागणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. टोमॅटोची सद्यस्थिती लक्षात घेऊन नुकसानग्रस्तांना तुर्तास आर्थिक मदत देऊन वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा दीर्घकालीन उपाय योजण्याची निकड आहे.  – डॉ. गिरधर पाटील (कृषी अभ्यासक)