लघुसंदेशाद्वारे पर्यटकांना माहिती देण्याची तयारी

नाशिक शहरात बाहेरून येणारे पर्यटक आणि भाविकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे लघुसंदेशाच्या (एसएमएस) माध्यमातून शहर परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती देण्याची तयारी करण्यात आहे. मात्र यातील तांत्रिक त्रुटींचा विचार न करता भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडकडे (बीएसएनएल) याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा परिसरात ज्या भागातून एखादा पर्यटक नाशिक शहरात प्रवेश करेल, त्या वेळी ‘तुमचे नाशिक शहरात स्वागत आहे’ असे आदरातिथ्य केल्यावर महामार्गावर असणाऱ्या पर्यटन स्थळाची माहिती त्यांच्या भ्रमणध्वनीवर लघुसंदेशाद्वारे झळकेल, अशी संकल्पना पर्यटन महामंडळाने मांडली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच भारतीय दूरसंचार निगमकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ही संकल्पना उत्तम असली तरी तांत्रिक अडचणींचा अडसर आहे.

कुठल्याही राज्यात किंवा रोमिंग असणाऱ्या शहरात प्रवेश करताना लघुसंदेशाच्या माध्यमातून ‘तुमचे स्वागत’ असा संदेश दिला जातो. जिल्हा परिसरात आयडिया, एअरटेल, जिओ, वोडाफोन यासह बीएसएनएल ग्राहकांना सेवा देत आहे. त्यामुळे एकाच कंपनीकडून असा संदेश कसा दिला जाईल? या प्रश्नासह इतरही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रस्ताव चांगला असला तरी त्याची कितपत अंमलबजावणी होईल? याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शहरात गोदावरी काठावरील रामकुंड, तपोवनासह जिल्ह्य़ात बारा ज्योतिर्लिगांपैकी एक त्र्यंबकेश्वर, पौराणिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण अंजनेरी, वणी येथे असणारे साडेतीन पीठांपैकी एक सप्तश्रृंगी मातेचे मंदिर, मांगी-तुंगी या धार्मिक स्थळांसोबत रामशेज, हरिहरगड, विश्रामगड असे गड-किल्ले आहेत. पावसाळ्यात दुगारवाडीजवळील धबधबा, सुरगाणा तालुक्यातील भिवतास असे अनेक लहान-मोठे धबधबे पावसाळी भ्रमंतीला चालना देतात. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याने तर नाशिकला जगाच्या नकाशावर ठळक असे स्थान दिले आहे. ‘वाइन सिटी’ म्हणून शहराला मिळालेली नवीन ओळख यामुळे परदेशी पर्यटकही या ठिकाणी येतात. याशिवाय जिल्ह्य़ाच्या सीमा परिसरातही अनेक वरुन पर्यटन स्थळे आहेत. यामुळे जिल्हा परिसरात भाविक तसेच पर्यटकांचा सातत्याने राबता राहिला आहे. येणारा भाविक किंवा पर्यटक हा विशिष्ट एखादे पर्यटन स्थळ किंवा ठिकाण डोक्यात ठेवून येतो. येणाऱ्या या पर्यटकांनी वेगवेगळ्या स्थळांची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.