शरद पवार, गिरीश महाजन, रामदास आठवले, आदित्य ठाकरे यांच्याकडून पाहणी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर जिल्ह्य़ात पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राजकीय मंडळींनी सुरू केलेल्या दौऱ्यात सोमवारी युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची भर पडली. आदित्य यांचे उशिराने आगमन झाले अन् नंतर तातडीने मुंबईला परतण्याचा संदेश आल्यामुळे त्यांना नियोजित दौरा आटोपता घ्यावा लागला. वेगवान धावता दौरा करीत त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. मोटारीतून उतरून ते चिखलमय शेतात गेले. द्राक्ष बागेत चिखलात रुतलेल्या ट्रॅक्टरची गंमत पाहण्याऐवजी तो बाहेर काढण्यासाठी सेनेची यंत्रणा कामाला लावली. राजकीय दौऱ्यांची मालिका सुरू आहे. मात्र हाती काही लागत नसल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. ऐनवेळी दौऱ्यात कपात झाल्यामुळे आदित्य यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला.

सततच्या पावसाने जिल्ह्य़ात तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे हादरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचे सत्र सुरू आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या पाठोपाठ सोमवारी युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजेपासून दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतु कोकणातून त्यांना येण्यास विलंब झाला. यामुळे पूर्वनियोजित दौऱ्यात फेरबदल करावे लागले. सटाणा, विभागीय महसूल आयुक्तांची भेट असे काही कार्यक्रम रद्द करण्यात आले.

ओझरपासून दौऱ्याला सुरुवात झाली. प्रारंभी मोहाडी, पिंपळगाव येथील द्राक्ष बागा आणि इतर पिकांची पाहणी केली. पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले. काही दिवसांपूर्वी याच भागात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. सेना नेत्यांचे शिष्टमंडळ संबंधित कुटुंबीयांची भेट घेणार होते. गावातील शेतकरी प्रतीक्षा करत होते. परंतु विलंब झाल्यामुळे सेना नेत्यांचा ताफा तिकडे गेलाच नाही. मोहाडीवरून ते वडनेर भैरवकडे निघून गेले. तिथे द्राक्ष उत्पादकांची भेट घेऊन चर्चा केली. पिकांची बिकट अवस्था शेतकऱ्यांनी कथन केली. मालेगावजवळील टेहेरे गावात आदित्य यांनी पाण्याखाली गेलेल्या कांदा पिकाची पाहणी केली. नेत्यांचे दौरे होत असून हाती काही लागत नसल्याची खंत ठिकठिकाणी व्यक्त झाली. शिवसेनेकडून आम्हाला आशा आहे. आश्वासन पाळले तरच विश्वास बसेल, सरसकट सात-बारा कोरा करावा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शिवसेना आणि सरकार तुमच्या सोबत आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, असे आश्वासन आदित्य यांनी दिले.

दौरा सुरू असताना मुंबईला तातडीने परतण्याचा निरोप आला. यामुळे ठिकठिकाणी धावती भेट देण्यावर सेना नेत्यांचा भर राहिला. रस्त्यात थांबून शेतकऱ्यांशी काही मिनिटे चर्चा करायची आणि पुढे निघायचे असे स्वरूप राहिले.

चिखलात अडकलेल्या ट्रॅक्टरसाठी मदतीचा हात

दौऱ्यात चिखलमय द्राक्ष बागा आणि पाण्यात बुडालेल्या कांदा पिकाची आदित्य यांनी थेट शेतात जाऊन पाहणी केली. जानोरी परिसरात पाहणी करताना बागेत फवारणी करणारा ट्रॅक्टर चिखलात अडकलेला दृष्टिपथास पडला. वाहन थांबवून ते तिथे गेले. जिल्ह्य़ातील बहुतांश द्राक्ष बागांमध्ये चिखलामुळे दोन-तीन ट्रॅक्टर लावून फवारणीचे काम करावे लागत आहे. अनेक ठिकाणी ट्रॅक्टर चिखलात अडकून पडतात. फवारणीचे काम बंद होते. ही बाब शेतकऱ्याने मांडल्यानंतर आदित्य यांनी स्थानिक सेना नेत्यांना संबंधितास मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सेना पदाधिकाऱ्यांनी जेसीबी मागवून चिखलात अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढल्याचे विजय करंजकर यांनी सांगितले.