कर्जबाजारी झाल्यामुळे निफाड तालुक्यातील विंचुर येथील व्यापाऱ्याने रोकड लंपास केल्याचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा आणि लासलगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून यातील एक जण फरार आहे. पोलिसांनी संशयितांकडून आठ लाख रुपये ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लासलगाव परिसरातील पाचोरे येथील कांदा व्यापारी राहुल सानप यांनी सोमवारी लासलगाव येथील अ‍ॅक्सिस बँक शाखेतून नऊ लाख रुपये काढत बॅगमध्ये ठेवले. स्वतच्या स्विफ्ट कारमधून विंचुरकडे जात असताना नऊ  लाख रुपये असलेली बॅग दोन संशयितांनी लंपास केली. या त्यांच्या तक्रारीवरुन लासलगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या लूटमारीमुळे व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यांनी मंगळवारी लासलगाव बाजार समिती बंद ठेवली होती. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि लासलगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी तपासात तेथील सराईत गुन्हेगार तसेच अन्य माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

तक्रारदार राहुल सानप यांनी दिलेली माहिती आणि सीसीटीव्हीमधील चित्रीकरण यात कोणताच मेळ बसत नसल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी राहुल याच्यावर संशय आला.

लुटमारीची घटना घडल्यानंतर १५ मिनिटाच्या आत संशयित रमेश सानप (२७) यास तक्रारदाराने तीन दूरध्वनी केल्याचे आढळले. याविषयी रमेशकडे विचारणा केली असता त्याने राहुलने अ‍ॅक्सिस बॅंकेजवळ दुपारी एक वाजता घ्यायला ये, असे सांगितले होते. त्यानुसार मी आलो अशी माहिती दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी राहुलची कानउघाडणी करताच आपण कर्जबाजारीपणामुळे लूटमारीचा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी या प्रकरणी राहुल सानपसह अभिजीत सानप, रमेश सानप यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील आठ लाख रुपये जप्त केले. या प्रकरणातील एका फरार आरोपाचा पोलीस शोध घेत आहेत.

असा बनाव रचला

राहुल हा शेतीमालाचा व्यापारी असून त्याच्यावर र्मचट बँक आणि व्यापाऱ्यांचे कर्ज आहे. कर्जदारांचे पैसे देण्यासाठी त्याने लुटीचा बनाव रचला. मावसभाऊ अभिजीत सानप याला दोन लाख रुपये देणे बाकी असल्याने या लुटीत त्याला तसेच रमेश सानप आणि अन्य एका व्यक्तीला सहभागी करून घेतले. योजनेनुसार २३ एप्रिल रोजी अ‍ॅक्सिस बँकेतून राहुलने नऊ लाख रुपये काढले. गाडीच्या पुढील भागात पैसे असलेली बॅग ठेवली. विंचुर रस्त्याने पुढे जात असतांना गाडीचे टायर पंक्चर झाले असल्याचा बहाणा करत तो खाली उतरला. मावसभाऊ अभिजीत त्या ठिकाणी आपल्या पल्सरवर आला. त्याच्याकडे राहुलने मिरची पूड दिली. गाडीजवळ झटापट झाल्याचा देखावा निर्माण करत अभिजीतने राहुलच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. गाडीतील पुढच्या बाजूला ठेवलेली पैशाची बॅग अभिजीतसोबत आलेल्या व्यक्तीने उचलली. दोघेही फरार झाले. हा प्रकार घडल्यानंतर काही वेळाने रमेश त्या ठिकाणी आला. त्याने राहुलला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.