श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी दुपारी बारा वाजेपासून मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी निमाणी स्थानक व पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या बसेस पंचवटी डेपोतून सोडण्यात येतील.
शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी म्हटले आहे.
शनिवारी वाकडी बारव येथून मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक जहांगीर मशिद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, अब्दुल हमिद चौक, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधी रोड, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, स्वामी विवेकानंद रोड, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरीया रस्त्याने रामकुंडावर पोहोचेल. यामुळे हा मिरवणूक मार्ग शनिवारी दुपारी बारा वाजेपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी पयार्यी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या दिवशी उपरोक्त कालावधीत निमाणी बसस्थानक व पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बसेस व इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका चौकाकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. तसेच पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका चौकातून कन्नमवार पुलावरून जातील. उपरोक्त र्निबध पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत.