द्वारका चौकातील समस्येला उड्डाणपूल कारणीभूत असतानाही आणली उड्डाणपुलांची सूचना

शहरातील अतिशय वाहन वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका चौक ते नाशिक रोड या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा नको ते उपाय सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार सारडा सर्कल ते सिन्नर फाटा उड्डाणपुलाची उभारणी, काही विशिष्ट ठिकाणी पुलावरून चढ-उताराची व्यवस्था, हे खर्चीक प्रकल्प नको असल्यास द्वारका चौफुली हटवून तिथे सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करणे यांचा त्यात अंतर्भाव आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलामुळे उद्भवलेल्या समस्या समोर असताना पुन्हा तसाच उपायाचा पर्याय नाशिक-पुणे महामार्गासाठी सुचविला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिक शहर आणि नाशिक रोड, पंचवटी आणि सिडको, अंबड अशा सर्व भागांना जोडणारा द्वारका हा मध्यवर्ती चौक आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय आणि नाशिक-पुणे हे दोन्ही महामार्ग याच चौकात परस्परांना छेदतात. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी या परिसरात क. का. वाघ महाविद्यालय ते गरवारे चौक असा सहा किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाची उभारणी झाली आणि शहरात वाहतुकीशी निगडित नवीन समस्यांचा जन्म झाला.

शहरातील सर्व भाग आणि दोन महामार्गाना जोडणाऱ्या द्वारका चौकात दररोज होणारी अभूतपूर्व कोंडी हा त्याचाच एक भाग. उड्डाणपुलाच्या उभारणीपश्चात इंदिरानगर बोगदा, अन्य ठिकाणी वाहनधारक-नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नियोजनाअभावी शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर उद्भवलेली स्थिती डोळ्यासमोर असताना आता त्याच काहीसा तसाच प्रयोग शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सुचविला गेला आहे.

मागील तीन वर्षांपासून द्वारका ते दत्तमंदिर या मार्गावर चार पदरी उड्डाणपूल व्हावा, याकरीता केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. प्रस्तावित मार्ग हा नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात येत असल्याने त्याचे काम करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तयार नव्हते. मात्र राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता हस्तांतरीत केल्यास ४०० कोटींचा निधी दिला जाईल तसेच उड्डाणपुलाचे काम कोणत्याही परिस्थितीत केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्यानुसार या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीने केलेल्या अभ्यासाची माहिती खा. हेमंत गोडसे आणि आकार अभिनव कंपनीचे संचालक अमोल खैर यांनी दिली.

नाशिक-पुणे मार्गावर द्वारका चौक ते नाशिक रोड या पट्टय़ात दोन्ही बाजूंना मोठी नागरी वसाहत, व्यापारी संकुले, चित्रपटगृह, शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये, लष्करी आस्थापना आहेत. या मार्गावरून जाणाऱ्या एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ५५ टक्के आहे. उर्वरित वाहनांमध्ये तीनचाकींसह मालमोटार, बस आदींचा समावेश आहे. बाहेरगावी जाणाऱ्या आणि शहरातील वाहनधारकांची या मार्गावर गर्दी असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो. याचा अभ्यास करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मांडलेल्या वेगवेगळ्या पर्यायांची माहिती देण्यात आली.

शहरातील सारडा सर्कल चौकातून मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरून थेट नाशिकरोडपर्यंत उड्डाणपूल तयार करण्याचा समावेश आहे. या पुलावर काठे गल्ली, फेम चित्रपटगृह, उपनगर या ठिकाणी वाहनांना चढ-उतारासाठी सुविधा केल्यास खालील वाहतुकीचा ताण कमी करता येईल. यासाठी ३.७ किमी लांबीचा मार्ग राहील. शक्य त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर ही वाहने नेण्यात येतील.

या पर्यायासाठी ४५ किलोमीटर जागा उपलब्ध असून ती महापालिकेच्या ताब्यात आहे. उड्डाण पुलासाठी अतिरिक्त जागा लागणार आहे. त्या संदर्भात महापालिका जागा देणार की नाही, याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाईल. हा खर्च महापालिकेने उचलावा अशी अपेक्षा आहे. या संदर्भातील तिन्ही पर्यायांची चाचपणी करत त्यासाठी किती खर्च येतो, त्यावर कोणत्या एका पर्यायाची निवड करायची यावर विचार करून जानेवारी अखेपर्यंत या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचे गोडसे यांनी सूचित केले.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय

  • सारडा सर्कल ते सिन्नरफाटा दरम्यान ५.९ किलोमीटरच्या उड्डाण पुलाची उभारणी
  • सारडा सर्कल ते सिन्नर फाटा उड्डाण पूल तयार करतांना तो ठिकठिकाणी खंडित स्वरूपात करणे. म्हणजे काठे गल्ली, फेम चित्रपटगृह, उपनगर, नाशिकरोड पुलावर चढ-उताराची व्यवस्था.
  • वरील दोन्ही पर्याय खर्चीक असल्याने द्वारका चौफुली हटवत तेथे सिग्नल बसवून वाहतुकीचे नियमन.