News Flash

‘स्मार्ट’कामात प्रवासाचा त्रास

वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास वेळ

नाशिक शहरातील सीबीएस ते मेहेर चौक या मार्गावर गर्दीच्या वेळी वाहनधारकांच्या अशा लांबच लांब रांगा लागतात.

वाहतूक कोंडीमुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास वेळ

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रस्त्याच्या कामासाठी वाहतूक शाखेने केलेल्या नियोजनाचे तीनतेरा वाजले असून त्याचा जाच शहरवासीयांना सोसावा लागत आहे. मेहेर सिग्नल-सीबीएस सिग्नलसह या मार्गावर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्याचा परिणाम दोन्ही चौकातील सिग्नलवरील वाहतूक कोलमडण्यात होत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका चौक या दरम्यानचा रस्ता स्मार्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यान एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूकडून दुहेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. अवजड वाहनांना या रस्त्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ दुचाकी, चारचाकी वाहने, शहर वाहतुकीची बससेवा यांसारखी वाहने या भागातून ये-जा करू शकतात. सीबीएस हा शहरातील प्रमुख मध्यवर्ती चौक. बस स्थानक, जिल्हा न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा-महाविद्यालये यामुळे या भागात ये-जा करणाऱ्यांची सदैव मोठी गर्दी असते. याशिवाय वेगवेगळ्या भागांत जाण्यासाठीही या चौकातून मार्गस्थ व्हावे लागते.

वाहनांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या या भागात रस्ते कामामुळे केलेल्या नियोजनाने वाहनधारकांची अक्षरश: परीक्षा पाहिली जात आहे. या मार्गावर छोटेखानी दुभाजक टाकून दोन्ही बाजूनेहतूक होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मेहेरकडून सीबीएसकडे जाताना किमान चार ते पाच सिग्नल पडल्यावर वाहनधारक सीबीएस चौकातून पुढे जाऊ शकतो. तशीच स्थिती सीबीएसकडून मेहेर सिग्नल ओलांडणाऱ्या वाहनधारकांची आहे.

या एकंदर स्थितीत वाहनाद्वारे अर्धा किलोमीटरचे अंतर पार करण्यास नाहक अर्धा तास खर्च करावा लागत आहे. वेळेचा अपव्यय होतोच, शिवाय नाहक जळणाऱ्या इंधनाचा आर्थिक भरुदड वाहनधारकांना बसत आहे. या मार्गावरील वाहनांच्या रांगा पाहून पादचाऱ्यांना तर मार्गस्थ कसे व्हावे, असा प्रश्न पडत आहे.

दुपार, सायंकाळची कोंडी

अरुंद मार्गामुळे सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी दोन ते तीन तास सीबीएस ते मेहेर सिग्नलदरम्यान वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात. सीबीएस चौकातील सिग्नल जेव्हा पडतो, तेव्हा मेहेरकडून सीबीएसकडे जाणारे आणि सीबीएसकडून मेहेरकडे येणारे वाहनधारक एकाच बाजूला समोरासमोर उभे ठाकतात. त्यात बससारखी वाहने असल्यास पुढे जाण्यासाठी एकच चढाओढ उडते. त्यात अन्य बाजूचा सिग्नल पडल्यावर त्या भागातून वाहने या अरुंद मार्गावर येण्यासाठी धडपडतात. या सर्वाचा परिणाम सीबीएस चौकातील सिग्नलवरील वाहतूक विस्कळीत होण्यावर झाला आहे. हे कमी म्हणून की काय, मार्गावरील वाहतूक कोंडीतून काही दुचाकीधारक तात्पुरते दुभाजक ओलांडून जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनधारकांना अडथळे निर्माण होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:30 am

Web Title: traffic congestion in nashik 2
Next Stories
1 नाशिकचे अनंत देशमुख लेफ्टनंट
2 उद्योजकीय कौशल्य आत्मसात करण्याची वारांगनांची मानसिकता
3 जुगार अड्डे चालविणारे १३ जण तडीपार
Just Now!
X