कसारा घाटातील जुना मार्ग दुरुस्तीअभावी अद्याप बंदच

इगतपुरी : पावसामुळे खड्डेमय झालेल्या नाशिक-मुंबई महामार्गावर सलग तीन आठवडय़ांपासून वाहनांची रखडपट्टी सुरू असून कसारा घाटात खचलेल्या मार्गाची अद्याप दुरुस्ती न झाल्यामुळे दुसऱ्या मार्गावर कोंडीतून मार्ग काढतांना वाहनधारकांची अक्षरश: दमछाक होत आहे. या मार्गावर प्रत्येक टप्प्यावर टोल वसुली केली जाते. टोलकडे जेवढय़ा प्राधान्याने लक्ष दिले जाते, तितके प्राधान्य रस्ते दुरुस्तीला मिळाले नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. खड्डेमय मार्गातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना कसारा घाटातील कोंडीने हैराण केले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे.

इगतपुरी तालुक्यात महिन्यापासून पाऊस सुरू असून तीन आठवडय़ांपूर्वी कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या रस्त्याचा काही भाग खचला आहे. मातीचा भराव ढासळल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून रस्त्याला लांबलचक भेग पडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करून कसारा घाटातील नवीन मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तेव्हा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दुरुस्तीचे काम झाले नव्हते. पाऊस कमी झाल्यावर हे काम होईल, अशी वाहनधारकांची अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. किरकोळ दुरुस्तीचे प्रयत्न झाले. मात्र त्यातून खचलेला भाग तगण्याची शक्यता नव्हती. रस्त्याखालील मातीचा भराव खालून भरावा लागणार आहे. पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतर हे काम करता येईल असे सांगितले जात आहे. या स्थितीचा विपरीत परिणाम कसारा घाटातील वाहतुकीवर झाला आहे. घाटातून ये-जा करण्यासाठी सध्या एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे. दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. घाटातील एका मार्गावर वाहतुकीचा कमालीचा ताण आल्याने परिसरात दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे.

सलग दोन दिवसांच्या सुट्टय़ांमुळे वाहनांच्या संख्येत वाढ होऊन

दोन-तीन तास वाहतूक ठप्प झाली. जुन्या कसारा घाटात दुपारच्या

सुमारास दोन वाहनांचा किरकोळ अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऐन दुपारच्या सुमारास घाटात वाहतूक ठप्प झाली. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी त्याची पुनरावृत्ती झाली. वाहनधारक पुढे जाण्यासाठी चढाओढ करतात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. अपघातग्रस्त वाहनांना मदतकार्य पोहोचविण्यास अडथळे येतात. यामुळे वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमिटपर्यंत गेल्याची

उदाहरणे आहेत. यात इगतपुरीच्या भावली धरण परिसरात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची भर पडली आहे. घोटी नाक्यावर टोलसाठी वाहनांच्या रांगा लागतात. या कोंडीतून बाहेर पडल्यानंतरही वाहनधारकांची समस्यातून सुटका होत नाही.

नाशिक ते कसारा मार्गापर्यंत महामार्गावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची दुरवस्था झाली असूनही दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. या महामार्गावर वेगवेगळ्या टप्प्यावर टोलआकारणी केली जाते. चांगल्या रस्त्यासाठी वाहनधारकांकडून पैसे घेतले जातात. परंतु रस्त्याची देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते, असा आक्षेप वाहनधारक नोंदवित आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील हा मार्ग आहे. त्यांनी वाहनधारकांना वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.