अग्रभागी ओढला जाणारा आसूड.. पिवळे ध्वज बांधून सहभागी झालेल्या दुचाकी.. लहानग्यांना घेऊन सहभागी झालेल्या महिला.. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चाललेली घोषणाबाजी.. कोणी आपल्याच आंदोलनाची भ्रमणध्वनीवर छायाचित्रे टिपण्यात मग्न.. अखिल भारतीय मातंग संघ आणि भारतीय बहुजन आघाडीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाचे हे स्वरूप सर्वाचे लक्ष वेधणारे ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांनी अचानक रास्ता रोको सुरू केल्याने आधीच विस्कळीत झालेली मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण देऊन सर्व क्षेत्रातील अनुशेष भरून काढावा, या मागणीसाठी आयोजिलेल्या मोर्चात भारतीय टायगर सेनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. दुपारी एक वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावेळी आरक्षणासाठी मातंग समाजाने मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांनी लाठीमार केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करावी आणि गंभीर जखमी झालेल्या मोर्चेकऱ्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. आरक्षणाच्या मागण्याच्या घोषणा देत मोर्चेकरी शालिमार, महात्मा गांधी रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. संपूर्ण मोर्चा मार्गावर मोर्चेकरी स्वत:च्या अंगावर आसुड ओढत होते. १५ ते २० बालके नाचत होती. मोर्चात दुचाकीही सहभागी झाल्या. आरक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मोर्चेकऱ्यांकडून भ्रमणध्वनीवर मोर्चाची छायाचित्रे टिपण्यात येत होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर मोर्चेकऱ्यांनी अचानक रस्त्यात ठाण मांडून रास्ता रोको सुरू केला. संबंधितांच्या या पवित्र्यामुळे पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. मोर्चात लहान मुले, महिलांची मोठी संख्या असल्याने त्यांना कसे हटवावे, असा प्रश्न पडला. संबंधितांची मनधरणी धरण्यात आली. २० ते २५ मिनिटांनी मोर्चेकरी बाजूला झाले. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास दिले. त्यात मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण द्यावे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत बंद केलेले कर्ज वितरण सुरू करावे, जाचक अटी रद्द करून जातीचा दाखला तहसीलदारांमार्फत देण्यात यावा, लहुजी साळवे आयोगाच्या शिफारसींची तात्काळ अंमलबजावणी करावी, अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक सभागृह बांधावे, गायरान जमिनींचे पट्टे नावावर करावे अशा मागण्या केल्या.