खोदलेल्या रस्त्यांमुळे वाहनधारक, प्रवासी त्रस्त

वणी : नाशिक-वणी रस्त्यावरील ओझरखेड गावालगतच्या पुलावरील रस्त्याच्या डागडुजीचे काम रखडल्याने वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. धोकादायक वळणावर कित्येक महिन्यांपासून खोदलेल्या रस्त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने भाजीपाल्यासह प्रवासी वाहतूक करणारी वाहने अडकून पडतात. दैनंदिन प्रवास करणारे वाहनधारक आणि प्रवासी त्रस्त झाले असताना प्रशासकीय यंत्रणांनी दुर्लक्ष करण्याचे धोरण ठेवले आहे. नाशिक-वणी रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येला ठेकेदाराचे वेळकाढू धोरण जबाबदार असल्याचा स्थानिक ग्रामस्थांसह वाहनधारकांचा आक्षेप आहे.

वणी-नाशिक राज्य मार्ग क्रमांक १७ च्या नूतनीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. त्या अंतर्गत ओझरखेड गाव आणि ओझरखेड धरणाच्या सांडव्यावरील पुलावर रस्त्याच्या डागडुजीचे काम होत आहे. त्यासाठी ओझरखेड गावाजवळील वळणावर चार महिन्यांपासून साधारण दोन-अडीच फूट रस्ता खोदून ठेवला आहे.

धोकादायक वळणावर रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालविणे धोकादायक झाले आहे. याच ठिकाणी रस्त्याचा आकार कमी असल्याने वाहतूक कोंडी होते. तशीच स्थिती ओझरखेड धरण सांडव्याच्या पुलावर सायंकाळी वाहतूक तासंनतास खोळंबून राहते. या ठिकाणी पुलावर एकाच दिशेने दोन्ही बाजूने रस्त्याचे काम अर्धवट आहे.

रस्ता अगदी अरुंद झाला असून अर्धा किलोमीटरपेक्षा कमी रस्त्याचे काम मंदगतीने होत आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक सुरळीत राहावी ही जबाबदारी ठेके दाराची आहे. पण त्यांना त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र आहे. मुळात हा महत्वाचा राज्यमार्ग असून राज्य, परराज्यात जाणारी वाहने अनेकदा कोंडीत अडकून पडतात. रुग्णवाहिकाही कोंडीतून सुटलेल्या नाहीत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही उपाययोजना करणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करीत लगबगीने भूमिपूजन झालेल्या या रस्त्याचे काम रखडले. निवडणुकीपूर्वी या कामास सुरुवात झाली होती. पण कामाचा वेग इतका मंदावला की, अजूनही हा रस्ता पूर्ण झालेला नाही. वणी-नाशिक रस्त्यावर आक्राळे फाटा ते नामपूर असा ९५ किलोमीटरचा राज्यमार्ग असून हा रस्ता तयार करून १० वर्षे देखभाल करायची आहे. यातील दोन वर्षे काम करण्यात जात आहेत. अजून काम पूर्ण झालेले नाही. २१४ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या कामाचे कंत्राट एचपीएम इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. संबंधित कंपनीकडून विहित मुदतीत काम पूर्ण होणे आवश्यक आहे. कामातील दिरंगाईचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

वणी-नाशिक रस्त्यावर ओझरखेड गावाजवळील दररोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. चार महिन्यांपासून पुलावर काम सुरू आहे. त्यासाठी जितका वेळ लागत आहे, तेवढय़ा वेळात नवीन पूल तयार झाला असता. पण दुरुस्ती अजून शक्य झाली नाही.

– राहुल गांगुर्डे  (सामाजिक कार्यकर्ते, वणी)

रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवणे ही जबाबदारी ठेकेदाराची आहे. ओझरखेड गावाजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यास ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. या वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना बसतो.  लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.  यंत्रणेला सर्वसामान्यांच्या समस्येशी काही घेणे देणे नाही.

गणेश खरे, संचालक, खरे क्लासेस, वणी)