वाहन तपासणीदरम्यान एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाच्या डोक्यात नारळ मारल्याने वाहतूक पोलीस जखमी झाल्याची घटना सिन्नर फाटा परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार रवींद्र मोरे याला अटक करण्यात आली असून सुकदेव अहिरे असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

अहिरे हे बुधवारी रात्री सिन्नर फाटा पोलीस चौकीसमोर नाकाबंदीत कर्तव्यावर होते. यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या मोरे याला त्यांनी अडविले. मोरे हा हनुमान मंदिरात जात होता. अडविल्याचा राग येऊन मोरे याने दुचाकी का अडविली? मी कोण हे माहिती नाही का? अशी अरेरावी करत अहिरे यांना लाथ मारली आणि हातातील नारळ अहिरे यांच्या डोक्यावर मारल्याने ते जखमी झाले.

या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक तसेच अन्य वाहनधारक अनेकदा वाहतूक पोलिसांना जुमानत नाहीत. रिक्षाचालक तसेच बेशिस्त वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सिन्नर फाटा येथे नाकाबंदीवेळी बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.