विशिष्ट दुचाकी न उचलण्याचा छुपा करार

मध्यवर्ती बाजारपेठेतील रस्त्यांवर बेकायदा दुचाकी वाहन उभे करणाऱ्या काही चालकांची वाहने न उचलण्याची नवी शक्कल वाहतूक पोलिसांनी लढविली आहे. यामध्ये रस्त्याच्या दिशेने चेहरा करून उभ्या असलेल्या दुचाकी उचलल्या जात नसून ही मोकळीक म्हणजे व्यापारी आणि वाहने उचलणारी यंत्रणा यांच्यातील छुप्या कराराचा भाग असल्याची वदंता करण्यात येत आहे. रस्त्यांवर बेकायदा दुचाकी वाहने उभी करणे हा वाहतूक नियमाचे उल्लंघन असतानाही अलिखित नियम करून कारवाईत अशा प्रकारे भेदभाव केला जात असल्याची वाहनधारकांमध्ये नाराजीची सूर उमटत आहे.

शहरातील बहुतांश व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळाचे नियम धाब्यावर बसविले गेले आहेत. रस्त्यालगतची जागा दुचाकी, चारचाकी वाहनांचे बेकायदा तळ बनले आहे. वाहनधारकांना रस्ते आणि लगतची जागा वगळता वाहने उभी करण्याची कोणतीही सुविधा महापालिकेने उपलब्ध केलेली नाही. व्यापारी संकुलांनी वाहनतळाची जागा लुप्त केल्यामुळे त्या ठिकाणी जे वाहनधारक येतात, त्यांनाही रस्ता हा एकमेव आधार असतो. या सर्वाची परिणती बहुतांश रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडीत होते. या पाश्र्वभूमीवर, वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या राहणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईचे अस्त्र उगारले. या कारवाईत खासगी ठेकेदारामार्फत टेम्पोद्वारे नियमांचे पालन न करणारी वाहने उचलून नेली जातात. ही वाहने शरणपूर रस्त्यावरील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जमा केली जातात. या ठिकाणी वाहनधारकांकडून दंड वसुली केली जाते.

या कारवाईमुळे मध्यवर्ती बाजारपेठेत व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापारी वर्गाची भावना आहे. वाहतूक पोलिसांचे वाहन येऊन क्षणात सर्व वाहने उचलून नेते. यामुळे दुकानात आलेले ग्राहकही माघारी निघून जातात. गाडी जमा केली जाऊ नये म्हणून त्यांची धावपळ उडते. ही बाब शहरवासीयांना ज्ञात झाल्यामुळे ते बाजारपेठेतील दुकानांकडे येणे टाळतात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी आणि वाहने उचलणारी यंत्रणा यांच्या डोक्यातून अफलातून कल्पना जन्माला आल्याचे सांगितले जाते. दुकानात आलेल्या ग्राहकाने रस्त्यावर दुचाकी उभी करताना ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चेहेरा करून लावायची. म्हणजे सर्व वाहने एका बाजूला आणि ग्राहक वा दुकानदाराचे वाहन विरुद्ध दिशेला राहील अशा पद्धतीने ती उभी करावीत अशा अप्रत्यक्ष सूचनाच व्यापाऱ्यांना दुचाकी उचलणाऱ्या यंत्रणेने दिले असल्याचे सांगितले जाते. या छुप्या करारामुळे  जेव्हा टेम्पो ‘नो पार्किंग’मधील दुचाकी उचलायला येईल, तेव्हा कर्मचाऱ्यांना कोणती गाडी उचलायची आणि कोणती उचलायची नाही याचे आपसूक ज्ञात होते. ही बाब नियमभंग करणाऱ्या काही वाहनांवर कारवाई तर काही वाहनांना त्यातून सवलत मिळण्यास कारक ठरली आहे. वाहने जमा करणारे कर्मचारी विरुद्ध दिशेने लावलेली वाहने उचलत नाही. त्याच्या आसपासच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होते. परंतु ग्राहकाचे वा दुकानदाराचे वाहन ऐटीत रस्त्यावर उभे असते.

उभयतांच्या समन्वयातून हा सर्व प्रकार सुरू असल्याचे महात्मा गांधी रोड वा तत्सम रस्त्यांवर फेरफटका मारल्यावर दिसून येते. व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी ही शक्कल लढविण्यात आल्याचे पाहावयास मिळते, असे सांगितले जाते.

कारवाईत दुजाभाव

‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांवरील कारवाईत दुजाभाव होत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. रस्त्यावरील वाहने उचलताना कर्मचारी भेदभाव करतात. काही विशिष्ट वाहनांना हात लावत नाही तर त्यालगतची वाहने उचलून नेली जातात. दुसरीकडे ‘नो पार्किंग’मधील दुचाकी वाहने उचलून नेणारी यंत्रणा रस्ता अडविणाऱ्या चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई करीत नाही. चारचाकी-दुचाकी वाहनांवरील कारवाईत आधीच भेदभाव होत असताना आता दुचाकी वाहनधारकांमध्ये असे वर्गीकरण करून कारवाई केली जात असल्याचे चित्र आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.