वाहतूक पोलीस प्रवासी बनून कारवाई करणार, अवैध रिक्षांची शोध मोहीम

नाशिक : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दोलायमान झाल्यामुळे शहरवासीय ज्या ऑटो रिक्षा सेवेवर विसंबून आहे, त्यातील पिळवणूक काहीअंशी कमी होण्याच्या दिशेने वाहतूक पोलिसांनी उशिरा का होईना पावले टाकली आहेत. अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी, अरेरावीची भाषा करणाऱ्या रिक्षाचालकांचे वाहतूक पोलीसच प्रवासी बनून खरा चेहरा उघड करणार आहेत. यासाठी वाहतूक पोलीस विभागास १० कॅमेरे उपलब्ध झाले आहेत. वाहतूक परवाना संपुष्टात आलेल्या अवैध रिक्षांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी सोमवारी वेगवेगळी पथके स्थापन करून रिक्षाचालकांविरुद्ध कागदपत्र, परवाना वैधता तपासणी मोहीम सुरू केली आहे. शालिमारसह प्रमुख चौकात कारवाई सुरू झाल्यामुळे अनेक रिक्षा अंतर्धान पावल्या. मागील दोन वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. एसटीने बसफेऱ्या कमी केल्या असतांना महापालिकेची बससेवा सुरू झालेली नाही. नागरिक, विद्यार्थ्यांना रिक्षा हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. याचा लाभ घेऊन रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची पिळवणूक करतात. मीटरप्रमाणे भाडे आकारणीस नकार देतात. ही बाब लक्षात घेऊन मीटरप्रमाणे भाडे आकारणी बंधनकारक केली गेली. बेशिस्त रिक्षा वाहतुकीला प्रवासी त्रस्तावले असले तरी अन्य पर्याय नसल्याने चालकांची अरेरावी, पिळवणूक सहन करावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खास मोहीम हाती घेतल्याचे उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी सांगितले.

परवाना संपुष्टात आलेल्या रिक्षा जप्त करण्यात येत आहेत. दररोज सकाळी १० ते दुपारी एक या कालावधीत वेगवेगळ्या भागांत ही कारवाई केली जाणार आहे.

शहरात २३ हजारहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावत असल्या तरी केवळ १८ हजार रिक्षांकडे परवाना आहे. उर्वरित पाच हजार वा त्याहून अधिक रिक्षांकडे परवाना नाही. या अवैध रिक्षांची शोध मोहीम हाती घेण्यात आली. अन्य रिक्षांची कागदपत्र तपासणी, चालकाकडील परवाना, बिल्ला आदींची तपासणी केली जाईल. प्रवाशांची पिळवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांचा शोध घेण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांकडून मोहीम घेतली जाणार आहे. मीटरप्रमाणे येण्यास नकार देणाऱ्यांविरुद्ध किंवा तत्सम कार्यवाहीचे कॅमेऱ्यात चित्रण केले जाईल. त्यासाठी वाहतूक पोलीस विभागास १० कॅमेरे प्राप्त झाले आहेत.

– पौर्णिमा चौघुले-श्रींगी (पोलीस उपायुक्त)