वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयोग

शहरातील द्वारका चौकात चार प्रमुख रस्ते आणि सात इतर उपरस्ते एकत्र येत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते. इतकेच नव्हे तर लहान-मोठे अपघातही घडतात. या परिसरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी सहा मार्ग वाहतुकीसाठी बंद केले जात असून वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून होत असल्याचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी म्हटले आहे.

शहरातील विविध भागांना जोडणारा हा चौक वाहतूक कोंडीमुळे सर्वाची डोकेदुखी ठरला आहे. नव्या प्रयोगाद्वारे वाहतूक पोलिसांनी तोडगा काढण्याची तयारी चालविली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका हा मध्यवर्ती चौक. नाशिक-पुणे रस्त्यासह शहरातील विविध भागांना जोडणारा हा मुख्य चौक आहे. सर्व बाजूंनी वाहनांचा ओघ वाढत असल्याने वाहतूक कोंडीत दिवसागणिक भर पडत आहे. त्यामुळे हा चौक पार करणे वाहनधारकच नव्हे तर पादचाऱ्यांसमोरही आव्हान ठरते. या पाश्र्वभूमीवर, वाहतूक पोलिसांनी नव्याने नियोजन केले आहे. द्वारका चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी या परिसरातील सहा रस्त्यांवरील वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

वाहतूक नियंत्रणाबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी निर्गमित केली. वाहतुकीतील या र्निबधाची अंमलबजावणी शुक्रवारपासून होत आहे. वाहतुकीसाठी जे मार्ग बंद करण्यात आले, तेथील वाहनधारकांसाठी मार्गस्थ होण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत.

वाहनधारकांनी त्याचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे र्निबध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत.

वाहतुकीसाठी प्रवेश बंद झालेले रस्ते

  • वडाळा नाकाकडून सव्‍‌र्हिस रस्त्याने द्वारका चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक
  • पखाल रस्त्यावरून तसेच कऱ्हाड बंधू, संतोष मोटार गॅरेजजवळून सव्‍‌र्हिस रस्त्याने जाणारी वाहतूक
  • हॉटेलकडून सव्‍‌र्हिस रस्त्याने टाकळी चौफुलीकडे जाणारी सर्व वाहतूक
  • नानावलीकडून ट्रॅक्टर हाऊसजवळून, जाकीर हुसेन व शिवाजी चौक कथडाकडून सव्‍‌र्हिस रस्त्याने द्वारका बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक
  • वडाळा नाका, नागसेन नगर, वोक्हार्ट रुग्णालयाकडून सव्‍‌र्हिस रोडने द्वारकाकडे जाणारी वाहतूक
  •  द्वारका चौकातून बागवानपुरा बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक