News Flash

प्रशिक्षणार्थी परिचारिकेचा मृत्यू; विद्यार्थिनींचा रुग्णालयात गोंधळ

त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतीगृह आहे.

जिल्हा रुग्णालय आवारातील परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतीगृहात दर्जाहीन भोजन दिले जात असताना रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त विद्यार्थिनींनी बुधवारी महाविद्यालय व रुग्णालयात तोडफोड करत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पालकांकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली. या घडामोडींमुळे रुग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या सूचनेवरून विद्यार्थिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापण्याबरोबर वसतीगृहातील दोन महिला वॉर्डनची तडकाफडकी बदली करण्यात आली.
त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतीगृह आहे. या ठिकाणी १०८ मुली तर सात मुले शिक्षण घेतात. मागील काही महिन्यांपासून प्रशासन हेळसांड करीत असल्याची विद्यार्थिनींची तक्रार आहे. जे भोजन दिले जाते, त्यात किडे निघतात. पोटभर अन्नही दिले जात नाही. यामुळे विद्यार्थिनी वारंवार आजारी पडत असुनही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याचे सर्वामध्ये अस्वस्थता होती. एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर त्याचा उद्रेक झाला. दोन दिवसांपूर्वी सुप्रिया माळी ही विद्यार्थिनी चक्कर येऊन पडली. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना पलंगावरून ती खाली पडली. विद्यार्थिनींनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिली. रात्री सुप्रियाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी या घटनेची माहिती समजल्यानंतर सर्व विद्यार्थिनी जमा झाल्या. एका विद्यार्थ्यांने नोटीस फलकावरील काच फोडली. ही काच हातात शिरल्याने विशाल चौधरी व नयना परमार हे जखमी झाले. दरम्यानच्या काळात पालकही या ठिकाणी दाखल होऊ लागले. एका पालकाने वैद्यकीय अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली.
जिल्हा रुग्णालयाने विद्यार्थिनींनी भोजन वा उपचार मिळत नसल्याची तक्रार याआधी केली नसल्याचे म्हटले आहे. संबंधितांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य दिसत नाही. आधी तक्रार केली असती तर ही वेळ आली नसती, असे प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आ. देवयानी फरांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थिनींचे म्हणणे जाणून घेतले. विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांबाबत प्राचार्य, पाच विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महाविद्यालयातील वॉर्डन सरला गांगुर्डे व दिवेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 2:09 am

Web Title: trainee nurse died
Next Stories
1 महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध सामाजिक संघटनांचे निदर्शन
2 सनातन संस्थेविरोधात पुरोगामी संघटनांचे आंदोलन
3 टंचाईच्या उपाययोजनांवर सव्वा आठ कोटी खर्च
Just Now!
X