13 August 2020

News Flash

वैमानिक प्रशिक्षण कमी खर्चात

कमतरता दूर करण्यासाठी २००४ मध्ये गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली.

|| अनिकेत साठे

  •   हेलिकॉप्टर सरावाला सिम्युलेटरची जोड
  •   कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलचा प्रयोग

खासगी संस्थेत वैमानिकाचे प्राथमिक शिक्षण घ्यायचे म्हटले तर साधारणत: २० ते २२ लाख रुपये खर्च येतो. त्यात उड्डाण सराव अधिक खर्चीक असते. लष्कराचे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल दरवर्षी ७० ते ८० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन हेलिकॉप्टरचे वैमानिक बनविते. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या प्रत्यक्ष सरावाच्या जोडीला सिम्युलेटरची व्यवस्था आहे. या यंत्रणेवर हेलिकॉप्टर चालविण्याचा सराव करता येतो. या माध्यमातून गुणवत्ता कायम राखत संस्था वैमानिक प्रशिक्षणाचा खर्च कमी करण्यात यशस्वी झाली आहे.

भारतीय लष्करात १ नोव्हेंबर १९८६ रोजी हवाई विभागाची स्थापना झाली. प्रारंभीच्या काळात हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचा तुटवडा होता. ही कमतरता दूर करण्यासाठी २००४ मध्ये गांधीनगर येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली. हवाई सरावाचा कोणताही अनुभव नसणाऱ्या लष्करातील अधिकाऱ्यांना येथे प्राथमिक वैमानिक आणि नंतर ‘कॉबॅक्ट एव्हिएटर्स’ शिक्षणक्रम करावा लागतो. या दोन्ही प्रशिक्षणांतर्गत एकूण ९० तासांच्या हवाई उड्डाणाचा अनुभव दिला जातो. तसेच स्कूल प्रशिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षणक्रम राबविते. या सर्व प्रशिक्षणाचा आर्थिक भार लष्करी हवाई विभाग उचलते. स्कूलला एक तासाचे हवाई प्रशिक्षण द्यायचे असल्यास इंधन, हेलिकॉप्टर देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचा ताळमेळ केल्यास एक लाख रुपये खर्च येतो. ‘चिता’, ‘चेतक’ हेलिकॉप्टरसाठीचा हा खर्च आहे. ‘ध्रुव’ आणि इतर आधुनिक हेलिकॉप्टरसाठी तोच खर्च ताशी दोन ते अडीच लाख इतका आहे.

शिक्षणक्रमाच्या निकषानुसार प्रशिक्षणार्थीना संयुक्तपणे हवाई उड्डाणाचे धडे दिले जातात. तरीदेखील खर्च लाखोंच्या घरात असतो. प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत तडजोड न करता स्कूलने खर्च कमी करण्याचा विचार केला. तेव्हा सिम्युलेटर यंत्रणेचा पर्याय समोर आला होता. मुळात सिम्युलेटर यंत्रणा महागडी असते. मोठय़ा संख्येने असणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी तिचा विचार सयुक्तिक ठरतो. त्या अनुषंगाने स्कूलने सिम्युलेटर यंत्रणेचा अधिकतम वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले. हेलिकॉप्टरमधून आकाशात प्रत्यक्ष भरारी न घेता जमिनीवर आभासी पद्धतीने तोच सराव करण्याची सुविधा सिम्युलेटरमधून उपलब्ध होते. हवाई प्रशिक्षणात सिम्युलेटरचा वापर करणारी ही देशातील पहिली संस्था आहे. सध्या स्कूलकडे ‘चिता’, ‘चेतक’चे सिम्युलेटर असून त्यावर प्रशिक्षणार्थी कितीही तास सराव करू शकतात. यामध्ये इंधन आणि हेलिकॉप्टरच्या देखभाल-दुरुस्ती खर्चात बचत होते. शिवाय, विहित तासांपेक्षा अधिक प्रशिक्षण यंत्रणेच्या माध्यमातून मिळते. वैमानिकासाठीच्या दोन्ही शिक्षणक्रमातील काही तासांच्या हवाई सरावाचा कालावधी सिम्युलेटरकडे वर्ग करून लाखोंच्या खर्चात बचत करणे दृष्टिपथास आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सिम्युलेटरचे आर्थिक गणित

हवाई सरावाची आभासी पद्धतीने सुविधा देणारी सिम्युलेटर यंत्रणा महागडी आहे. भारतीय सैन्य दलांकडे जी हेलिकॉप्टर मोठय़ा संख्येने आहेत, त्यांच्या प्रशिक्षणात सिम्युलेटरवरील खर्च मेळ साधणारा ठरतो, याकडे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. गांधीनगरच्या केंद्रात ‘चिता’, ‘चेतक’चे सिम्युलेटर आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडे हलक्या वजनाची ‘एलसीएच’ हेलिकॉप्टर आहेत. ‘ध्रुव’ची संख्या मोठी आहे. अन्य सुरक्षा दलांकडून हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अशा काही हेलिकॉप्टरचे सिम्युलेटर एचएएलच्या बंगळूरुस्थित केंद्रात आहे. सर्व दलातील प्रशिक्षणार्थी तिथे सराव करतात, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलमधून दीड दशकांत शेकडो अधिकारी वैमानिक होऊन लष्कराच्या हवाई विभागात दाखल झाले. वैमानिक बनलेल्या बहुतेकांनी हेलिकॉप्टरच्या प्रत्यक्ष उड्डाणाबरोबर सिम्युलेटरवर सराव केलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 1:39 am

Web Title: training costs less aeronaut akp 94
Next Stories
1 ग्रामीण भागांत शिक्षणासाठी ‘ती’चा संघर्ष अजूनही सुरूच!
2 जाहीर सभा, प्रचार फेरी अन् ‘रोड शो’..
3 मनमाडकरांना सोळा दिवसांआड पाणी
Just Now!
X