नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. स्वत: तयार केलेल्या मूर्ती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.

येथील मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिराच्या सभागृहात मंगळवारी ही कार्यशाळा घेण्यात आली. संस्थेच्या वतीने १२ वर्षांपासून ही कार्यशाळा घेतली जाते. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मंचावर जु. स. रुंगटा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी, पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड, कार्यशाळेचे मार्गदर्शक स्वप्निल कटय़ारे, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा रोहिणी वालझाडे आदी उपस्थित होते. कुलकर्णी यांनी प्रत्येकाने पर्यावरणाशी मैत्री करावी आणि आपल्याकडून पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

प्रत्येकाने सण, उत्सवामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक, थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस यासारख्या पर्यावरणाला अपायकारक वस्तूंचा उपयोग टाळावा. कार्यशाळेत तयार केलेल्या गणेश मूर्तीची आपल्या घरी स्थापना करा, असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यशाळेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रारंभी कटय़ारे यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती कशी तयार करायची, याविषयी मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही गणेश मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला. सूत्रसंचालन मृणाली धारणे यांनी केले.