लष्कराच्या हवाई विभागाचा विशिष्ट रंगाचे निशाण देऊन सन्मान आणि तोफखाना दलाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या पाश्र्वभूमीवर, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गावर मंगळवारी सकाळी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालीम घेण्यात आली. संपूर्ण मार्गाची बॉम्ब शोधक-नाशक आणि विशेष गुन्हे श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली.

लष्करी हवाई दलास विशेष रंगाचे निशाण (ध्वज) देण्याचा सोहळा गुरुवारी सकाळी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत येथील गांधीनगरच्या कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन स्कूलच्या मैदानावर होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्त स्कूलच्या मैदानावर लाल किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सोहळ्यास दलाचे महानिर्देशक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल कंवल कुमार उपस्थित राहणार असून एव्हीएशन स्कूलचे प्रमुख सरबजित सिंग बाबा भल्ला यांच्या नेतृत्वाखाली संचलन होणार आहे.

मैदानावर हेलिकॉप्टर आणि लष्करी कवायतीची रंगीत तालीम होत आहे. राष्ट्रपती विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी ओझर विमानतळावर येणार आहेत. विमानतळावरून मुंबई-आग्रा महामार्ग मार्गे विश्रामगृहाकडे येतील. या मार्गावर मंगळवारी सायंकाळी त्याच सुमारास रंगीत तालीम घेण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितले. सकाळी शहर पोलिसांनी रंगीत तालीम घेतली. महामार्ग, मुंबई नाका, द्वारका, नाशिक-पुणे रस्ता गांधीनगरच्या आर्मी एव्हीएशन स्कूलपर्यंत सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

गुरुवारी सकाळी राष्ट्रपती विश्रामगृहातून गांधीनगरच्या आर्मी एव्हीएशन स्कूलमध्ये जाणार आहेत. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा ज्या मार्गावरून जाईल, त्या सर्व मार्गाची बॉम्ब शोधक-नाशक पथक, विशेष गुन्हे श्वान पथकाने कसून तपासणी केली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.