वाहतूक परिषदेत तक्रारींचा पाऊस

‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणाऱ्या नाशिकला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आयोजिलेल्या वाहतूक परिषद बैठकीत वाहतुकीशी संबंधित प्रश्न, अडचणी, नियोजनशून्य कारभार, रिक्षाचालकांची अरेरावी.. आदी तक्रारींचा पाऊस पडला. दुसरीकडे वाहतूक पोलिसांचे आरोग्य, त्यांनी काही ठिकाणी केलेले प्रयोग याविषयी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही पडली.

शहर पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक पोलीस विभाग यांच्यातर्फे आयोजित परिषद मंगळवारी रावसाहेब थोरात सभागृहात पार पडली. बैठकीस आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे व बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त विजय पाटील, उपायुक्त राजू भुजबळ, वाहतूक शाखेचे जयंत बजबळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. सुरुवातीला शहराला भेडसावणारा वाहतूक प्रश्न गुंतागुंतीचा कसा, या विषयी माहिती देण्यासाठी चित्रफित दाखविण्यात आली. यामध्ये अपघातांची आकडेवारी, त्यात नाशिकमध्ये अपघातात दगावलेल्यांची संख्या, वयोमान, कारणे यावर प्रकाश टाकण्यात आला. बहुतांश अपघातात वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच हेल्मेट न वापरल्याने जिवीतहानी झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. वाहतूक कोंडीविषयी रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. शहरात रिक्षा व्यवसाय नाहक बदनाम झाला आहे. काही अपप्रवृत्तींचा यामध्ये शिरकाव झाला. गणवेश व बिल्ला असलेला वाहनचालक आम्ही रिक्षावाला मानतो. यातील काही आरोप मान्य असले तरी आम्हाला उभे राहण्यासाठी जागा द्या, ओला टॅक्सीचालकांचा हस्तक्षेप टाळावा आदी मागण्या त्यांनी केल्या.

गंगापूर रोड व कॉलेज रोडवर दुचाकी वेगाने चालविल्या जातात. या ठिकाणी वेग मर्यादा ताशी ४० किलोमीटर ठेवावी तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा पाच वर्षांसाठी परवाना रद्द करण्यात यावा, व्यापारी संकुलांमध्ये वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करावी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, द्वारका चौफुलीची वाहतूक कोंडीतून मुक्तता, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अवैध प्रवासी वाहतुकीला चाप बसावा, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अवजड वाहनामुळे घडणारे अपघात या विषयी ठोस पावले उचलावी, अतिक्रमणांमुळे संकुचित झालेले रस्ते, बंद सिग्नल यंत्रणा, अपघात प्रणव क्षेत्र आदींकडे लक्ष वेधण्यात आले. वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेले प्रश्न मांडतांना नागरिकांनी त्याबाबत काही उपाय सुचविले. वाहतूक नियमांविषयी प्रबोधन होण्याकरिता शालेय स्तरावर आठवडय़ातील किमान एक तास देण्यात यावा, महाविद्यालयांमध्ये या विषयी प्रबोधन व्हावे, वाहने वापरांवर बंदी आणण्यापेक्षा सायकलचा पर्याय स्विकारावा, शहरातील काही ठिकाणे  ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून घोषित करावी, वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकाधिक अधिकार द्यावेत, वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा विचार करता त्यांना ‘पोल्युशन मास्क’ देण्यास सुचविण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी आमदार निधीतून निधी द्यावा, वेगवेगळ्या मोहिमांमध्ये वाहनांची तपासणी होत असतांना वाहनांवर विशिष्ट प्रकारचे स्टीकर्स लावण्यात यावे, जेणेकरून नियमांचे वारंवार उल्लंघन करणारे लक्षात येतील. बेशिस्त वाहनचालकांचे छायाचित्र होर्डिग्ज स्वरूपात शहरात लावण्यात यावे आदी उपाय सुचविण्यात आले.

वाहतूक समस्यांवर चित्रफीत

वाहतूक परिषदेच्या सुरुवातीला अपघाताची कारणे, शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, एकूण ४२ वाहनतळे मात्र प्रत्यक्षात २१ कार्यान्वित, अपघातप्रवण क्षेत्र, दंडात्मक कारवाईची माहिती, शहरातील अपघात तसेच वाहतूक कोंडीचे ‘ब्लॅक स्पॉट’ याविषयी सखोल माहिती सादर करण्यात आली.

पर्याय शोधण्यासाठी महाविद्यालयाचा पुढाकार

बैठकीत लोकप्रतिनिधी, वाहतूक संघटना, विद्यार्थी, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक यासह काही सामाजिक संस्था सहभागी. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहतूक प्रश्नांवर उपाय सुचविण्यासाठी सिम्बॉयसिस महाविद्यालयाचा पुढाकार.