04 July 2020

News Flash

Coronavirus : नाशिक विभागात ४४४ रुग्णांवर उपचार

करोनामुक्त ९८० रुग्ण घरी

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनामुक्त ९८० रुग्ण घरी

नाशिक : विभागात करोनाचे नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्यांचा आलेखही उंचावत आहे. पाच जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत एकूण १५३९ रुग्ण आढळले. त्यातील ९८० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. सद्यस्थितीत नाशिकमध्ये २१४, जळगाव १६५, धुळे ४०, नगर १६ आणि नंदुरबार नऊ अशा एकूण ४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे विभागात आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.

विभागाच्या सद्यस्थितीची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एम. आर. पटणशेट्टी यांनी दिली. विभागात करोनाचे सर्वाधिक ९३५ रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले. यात मालेगावमधील ६८५ रुग्णांचा समावेश आहे. त्याखालोखाल जळगावमध्ये ३९१, धुळे १०९, अहमदनगर ७४ आणि नंदुरबारमध्ये ३० रुग्ण आढळले. उपचारादरम्यान ११५ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक जिल्ह्यातील ४८ तर जळगावमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांमध्ये करोनाची लक्षणे नसणाऱ्या आणि सौम्य लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाण जवळपास ८० ते ८५ टक्के आहे. मध्यंतरी आरोग्य विभागाने अशा रुग्णांना १४ दिवसांऐवजी १० दिवसांत रुग्णालयातून सोडण्याची सूचना केली होती. शेवटच्या तीन दिवसांत रुग्णास ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे न दिसल्यास त्याला घरी सोडले जाते. यामुळे रुग्णालयातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली.

नाशिक जिल्ह्यात ६७३, जळगाव १७९, धुळे ५७, अहमदनगर ५२ आणि नंदुरबार जिल्ह्यातून १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विभागात उपचार सुरू असलेल्या ४४४ रूग्णांपैकी ४३२ जण संस्थात्मक अलगीकरणात तर १२ रुग्ण निवासस्थानी अलगीकरणात असल्याचे डॉ. पटणशेट्टी यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात मोफत औषध वाटप

करोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्तित वाढ व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन, रेड क्रॉस  सोसायटी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीने एक लाख नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम’ या होमिओपॅथीच्या औषधांचे मोफत वाटप केले जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रासह इतर ठिकाणच्या ५३ हजार नागरिकांना औषधाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

नाशिक शहरातील मृतांची संख्या चारवर

आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आगरटाकळी येथील ५४ वर्षांच्या व्यक्तीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने नाशिक शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहचली आहे. नाईकवाडी पुरा येथील महिलेच्या संपर्कात आलेला २९ वर्षांचा युवक आणि २१ आणि ७८ वर्षांच्या महिलेसह दोन वर्षांच्या मुलीलाही प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. शिवाजीवाडी येथील किराणा दुकानदार रुग्णाच्या संपर्कातील १७ वर्षांच्या मुलाचा अहवाल सकारात्मक आला. शहरात आतापर्यंत करोनाचे एकूण ७६ रुग्ण सापडले. त्यातील ४० जणांना घरी सोडण्यात आले. ३२ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.

मालेगावात १६ नवीन रुग्ण

मालेगाव तालुक्यात २४ तालुक्यात नव्याने १६ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी रात्री ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यात १७ सकारात्मक आणि ८२ अहवाल नकारात्मक आले. एक सकारात्मक अहवाल हा आधीच्या रुग्णाचा दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचा आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये दाभाडी कारखाना, सोयगाव आणि रमजानपुरा येथील प्रत्येकी दोन तसेच दाभाडी, रावळगाव, द्याने, गुलाब पार्क, जुना आग्रा रोड आणि गणेश नगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दाभाडी कारखाना येथील दोघे रूग्ण पोलीस आहेत. दाभाडीतील महिलेचा चार दिवसांपूर्वीच मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर केलेल्या चाचणीत ती बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. या महिलेचा पती मुंबई येथे पोलीस आहे. अलिकडेच मालेगावचे आयुक्त दीपक कासार आणि सहाय्यक आयुक्त वैभव लोंढे हे करोना बाधित असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर दोन वेळा केलेल्या चाचणीत आयुक्तांचा अहवाल नकारात्मक आला. पाठोपाठ सहाय्यक आयुक्त लोंढे यांचा अहवालही नकारात्मक आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 5:55 am

Web Title: treatment on 444 covid 19 positive patients in nashik division zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 नाशिक जिल्ह्यात ९०४ करोनाबाधित
2 मालेगावात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग लवकरच धडधडणार
3 गंजमाळ नुकसानग्रस्तांचे आंदोलन
Just Now!
X